संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत भारताने पाकिस्तानला चांगलेच फटकारले. नागरिक आणि दहशतवादी यांच्यामध्ये जो देश फरक करत नाही त्याला नागरिकांच्या सुरक्षेबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. पाकिस्तानी सैन्याने ऑपरेशन सिंदूरनंतर भारतातील सीमावर्ती गावांवर गोळीबार केला. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा बळी गेला. तसेच भारतातील धार्मिक स्थळांना पाकिस्तानने जाणूनबुजून लक्ष्य केले. याबद्दलची माहिती भारताने संयुक्त राष्ट्रसंघात दिली.
संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी पार्वथानेनी हरीश यांनी सांगितले की, पाकिस्तानी प्रतिनिधीने अनेक मुद्द्यांवर भारतावर निराधार आरोप केले. त्यामुळे त्या आरोपांना आम्ही उत्तर दिले. संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेच्या खुल्या चर्चेदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले. यापूर्वी संयुक्त राष्ट्रांमधील पाकिस्तानचे राजदूत असीम इफ्तिखार अहमद यांनी पुन्हा एकदा काश्मीरचा मुद्दा मांडला. तसेच भारत आणि पाकिस्तानमधील नुकताच झालेल्या संघर्षाबद्दल वक्तव्य केले.
पाकिस्तानच्या राजदूताच्या वक्तव्यानंतर भारताने पाकिस्तानची पोलखोल केली. पार्वथानेनी हरीश म्हणाले की, भारताने गेल्या अनेक दशकांपासून आपल्या सीमेवर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यांचा सामना केला आहे. मुंबई शहरावर 26/11 रोजी हल्ला झाला होता. त्या हल्ल्यापासून एप्रिल 2025 मध्ये पहलगाम पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यापर्यंतच्या सर्व प्रकरणात पाकिस्तानचा हात आहे. पाकिस्तानच्या या दहशतवादी कारवायांमध्ये सर्वसामान्य नागरिक लक्ष्य ठरले. कारण त्यांचा उद्देश आमची समृद्धी, प्रगतीवर हल्ला करणे आहे.
पार्वथानेनी हरीश यांनी सांगितले की, पाकिस्तान दहशतवाद्यांचा बचाव करण्यासाठी वारंवार सर्वसामान्य नागरिकांचा ढालीसारखा वापर करत आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या अंतिम संस्कारमध्ये पाकिस्तान लष्कारातील अधिकारी, पोलीस आणि वरिष्ठ सरकारी अधिकारी सहभागी झाले होते, त्याचा व्हिडिओ सर्व जगाने पाहिला आहे.
पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांची हत्या केली. या घटनेनंतर भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला. भारताने पाकिस्तानवर लष्करी कारवाई करत ऑपरेशन सिंदूर राबवले. त्यात पाकिस्तानचे ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाली. तसेच सिंधू जल वाटप करार भारताने स्थगित केला.