वैभववाडी : मुसळधार पावसाने (Sindhudurg Rain Update) जिल्ह्याला अक्षरश: झोडपून काढले. संततधारेमुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. करूळ घाटात (Karul Ghat) दरड कोसळल्याने तळेरे-कोल्हापूर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. काही घरे, वीज वाहिन्यांवर झाडे कोसळल्याने मोठे नुकसान झाले आहे.
जिल्ह्याला गुरुवारी (ता. २२) दिवसभर मुसळधार झोडपून काढले. किनारपट्टी भागात वाऱ्याचा वेग वाढला होता. संततधार पावसामुळे आंबोली, भुईबावडा घाटात दरड कोसळली होती. त्यानंतर करूळ घाटात देखील किरकोळ दगड कोसळले होते. त्यामुळे या सर्व मार्गावरील वाहतूक विस्कळीत होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने दीड दोन तासानंतर भुईबावडा घाटातील वाहतूक सुरळीत केली होती. जिल्ह्यात रात्रभर संततधार सुरू होती. सरीवर सरी कोसळत आहेत.
आज सकाळपासून देखील पावसामध्ये खंड पडलेला नाही. मुसळधार पावसामुळे करूळ घाटात पुन्हा दरड कोसळली. त्यामुळे तळेरे-कोल्हापूर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. दरडीने रस्त्याचा बहुतांशी भाग व्यापला. त्यामुळे घाटरस्त्यात शेकडो वाहने अडकली होती. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने दीड दोन तासांत दरडी हटवून वाहतूक पूर्ववत केली.
वैभववाडी येथील विजय गोपाळ तावडे यांच्या घराच्या अंगणावर वडाचे झाड कोसळले. त्यात मोठे नुकसान झाले. कणकवली-आचरा मार्गावरील पुलानजीकच्या पर्यायी मार्गावरून पावसाचे पाणी वाहू लागल्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात दुपारनंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाला.
कमी दाबाचे क्षेत्र जैसे थेदक्षिण कोकण किनाऱ्यावरील पूर्व मध्य अरबी समुद्रावरील हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र आज दुपारी अडीचपर्यत त्याच भागात कायम होते. पुढील २४ तासांत ते उत्तरेकडे सरकण्याची आणि अती तीव्र स्वरूपाच्या कमी दाबाच्या पट्ट्यात आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. याच कमी दाबाच्या क्षेत्राशी संबंधित चक्रवाती अभिसरणामुळे समुद्र सपाटीपासून १०५ ते ५.८ किलोमीटर उंचीवर दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा आणि उत्तर तेलगंणा ओलांडून छत्तीसगडपर्यत हवेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे. या दोन्ही प्रणालीमुळे दक्षिण कोकणात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. आज दुपारनंतर सिंधुदुर्गला रेड अलर्ट देण्यात आला होता.
मेमध्ये नदी, नाले प्रवाहित..सिंधुदुर्गात साधारणपणे मॉन्सून ६ ते ८ जूनला दाखल होतो. तत्पूर्वी २५ ते ३० मे या कालावधीत मॉन्सूनपूर्व पाऊस होतो. हा पाऊस खरीप हंगामासाठी पोषक असतो. अनेक शेतकरी याच पावसात पेरणी करतात. गेल्या काही वर्षात ८ मे पासून पावसाला कधीही सुरूवात झालेली नाही. दोन-तीन दिवस झाल्यानतंर पाऊस जात होता; परंतु, यावर्षी सलग पाऊस झाल्यामुळे आणि गेले दोन तीन दिवस मुसळधार पाऊस सुरू असल्याने मेमध्ये पहिल्यांदाच जिल्ह्यातील बहुतांशी नदी, नाले प्रवाहित झाले आहेत.
तालुकानिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये)देवगड-१०६
मालवण-५८
सावंतवाडी-१०२
वेंगुर्ला-१६७
कणकवली-११२
कुडाळ-११४
वैभववाडी-९२
दोडामार्ग-४५
जिल्ह्यात पडत असलेला पाऊस आणखी काही दिवस कायम राहणार आहे. हवामान विभागाने २२ मे २९ मे या कालावधीत प्रतिदिन ४० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज दिला आहे. याशिवाय २९ मे ५ जून या कालावधीत देखील ४० मिलिमीटर पावसाचा अंदाज दिला आहे. हवामान विभागाने आज मॉन्सूनपूर्व आणि मॉन्सून यामध्ये खंड पडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.