कसोटी संघातून सरफराज खान आणि श्रेयस अय्यरला का डावललं? अजित आगरकर म्हणाला…
GH News May 24, 2025 08:08 PM

टीम इंडियात शुबमन गिल पर्वाची सुरुवात झाली आहे. 24 मे 2025 रोजी निवड समितीने कसोटी संघासाठी टीम इंडियाची घोषणा केली. या संघाचं नेतृत्व शुबमन गिलच्या हाती सोपवलं आहे. टीम इंडियाच्या 16 सदस्यीय संघाची निवड इंग्लंड दौऱ्यासाठी करण्यात आली आहे. मात्र या संघात श्रेयस अय्यर आणि सरफराज खान यांचं नाव नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. कसोटी संघातून या दोघांना जागा मिळालेली नाही. मुख्य निवडकर्ता अजित आगरकरने इंग्लंड दौऱ्यासाठी सरफराज खानला संघात जागा का नाही? याबाबत आपलं उत्तर दिलं. ‘कधीकधी तुम्हाला फक्त चांगले निर्णय घ्यावे लागतात. मला माहित आहे की सरफराजने पहिल्या कसोटीत 100 धावा केल्या आणि नंतर तो धावू शकला नाही.कधीकधी संघ व्यवस्थापन निर्णय घेते.” असं अजित आगरकरने सांगितलं. ‘सध्या, करुणने देशांतर्गत सामन्यांमध्ये भरपूर धावा केल्या आहेत, काही कसोटी क्रिकेट खेळले आहेत, काही काउंटी क्रिकेट खेळले आहेत. विराट नसल्याने, अर्थातच आमच्याकडे अनुभवाची कमतरता आहे, आम्हाला वाटले की त्याचा अनुभव मदत करू शकेल.’, असंही अजित आगरकर पुढे म्हणाला.

अजित आगरकरने शेवटी सांगितलं की, सध्या कसोटी संघात श्रेयस अय्यरसाठी जागा नाही. अजित आगरकर म्हणाला, “श्रेयसने एकदिवसीय मालिकेत चांगली कामगिरी केली, देशांतर्गत सामन्यांमध्येही चांगली कामगिरी केली, पण सध्या कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्यासाठी जागा नाही.” 30 वर्षीय श्रेयस अय्यर भारतासाठी 14 कसोटी सामने खेळला आहे. शेवटचा कसोटी सामना फेब्रुवारी 2024 मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला होता. तेव्हापासून कसोटी संघातून बाहेर आहे. श्रेयस अय्यरला कसोटी संघात जागा न मिळाल्याने त्याचे चाहते भडकले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर आपआपल्या पद्धतीने थेअरी मांडण्यास सुरुवात केली आहे.

इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ: शुबमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, आकाश दीप, कुलदीप यादव.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.