शमी कसोटीचा गोलंदाज राहिला नाही, बीसीसीआयच्या वैद्यकीय समितीकडून संकेत
Marathi May 24, 2025 08:24 AM

गेली दोन वर्षे कसोटी क्रिकेटपासून दूर असलेला मोहम्मद शमी आता पहिल्याप्रमाणे गोलंदाजीचा दीर्घ मारा करू शकत नसल्याचे संकेत बीसीसीआयच्या वैद्यकीय समितीकडून मिळाल्यामुळे आगामी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याला वगळण्याची शक्यता आहे. येत्या 20 जूनपासून हिंदुस्थानचा संघ पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडच्या दौऱ्यावर रवाना होणार आहे.

हिंदुस्थानी कसोटी संघातून रोहित शर्मा आणि विराट कोहली निवृत्त झाल्यामुळे फलंदाजीत खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यातच संघाला नव्या नेतृत्वाखाली खेळावे लागणार आहे.

अशा स्थितीत हिंदुस्थानी संघाची मदार वेगवान गोलंदाजीवर असल्यामुळे जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद शमी या अनुभवी गोलंदाजांची संघाला नितांत गरज आहे. मात्र सध्या हैदराबादसाठी फिट असलेला शमी कसोटीच्या गोलंदाजीसाठी फिट नसल्याचे समोर आलेय. त्याचे खांदे दीर्घ गोलंदाजी करू शकत नसल्यामुळे त्याच्याऐवजी नव्या गोलंदाजाचीच वर्णी लागण्याची शक्यता आहे. मात्र तो कसोटीसाठी फिट आहे की अनफिट याबाबत कोणतीही अधिकृत माहिती कळू न शकल्यामुळे शमीचे भवितव्य ठरू शकलेले नाही.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.