इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत शुक्रवारी (२३ मे) ६५ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला ४२ धावांनी पराभूत केले. त्यामुळे बंगळुरूने शुक्रवारी पाँइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी जाण्याची संधी गमावली.
बंगळुरूचा हा चौथा पराभव आहे. त्यामुळे ते १७ गुणांवरच कायम राहिले असले तरी नेट रनरेट खालवल्याने ते दुसऱ्यावरून तिसऱ्या क्रमांकावर घसरले आहेत. हैदराबादला मात्र २ गुण मिळाले असल्याने त्यांचे आता १३ सामन्यांनंतर ११ गुण झाले आहेत. पण ते ८ व्या क्रमांकावर कायम आहेत.
आता हैदराबादला अखेरचा सामना बाकी आहे, तर प्लेऑफपूर्वी अखेरचा साखळी सामना अद्याप खेळायचा आहे.
दरम्यान, लखनौमध्ये शुक्रवारी झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोर विजयासाठी २३२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना बंगळुरूचा संघ १९.५ षटकात १८९ धावांवर सर्वबाद झाला. हैदराबादसाठी फलंदाजीनंतर गोलंदाजीतीलही सांघिक कामगिरी महत्त्वाची ठरली.
बंगळुरूकडून विराट कोहली आणि फिल सॉल्ट यांनी सलामीला फलंदाजी केली होती. त्यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करताना हैदराबादच्या गोलंदाजांना दबावात आणले होते. त्यांनी पॉवरप्लेच्या ६ षटकांमध्ये १० हून अधिकच्या धावगतीने धावा केल्या. यादरम्यान नोबॉलमुळे सॉल्टला जीवदानही मिळाले, ज्याचा त्याने चांगलाच फायदा घेतला.
विराट आणि सॉल्ट यांनी ७ षटकात ८० धावांची भागीदारी करत बंगळरूचा चांगली सुरुवात दिली होती. ७ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर विराटला हर्ष दुबेने अभिषेक शर्माच्या हातून झेलबाद केले. विराटने २५ चेंडूत ७ चौकार आणि १ षटकारासह ४३ धावांची खेळी केली.
पण त्यानंतर मयंक अगरवाल एका बाजूने सॉल्टला साथ देत होता. सॉल्टने आक्रमक अर्धशतकही केले. त्याच्यात आणि मयंकमध्ये ४० धावांची भागीदारी झाली. पण ११ व्या षटकात मयंकला ११ धावांवर नितीश रेड्डीने इशान किशनच्या हातून झेलबाद केले.
पाठोपाठ पुढच्याच षटकात सॉल्टला पॅट कमिन्सने हर्षल पटेलच्या हातून झेलबाद करत बंगळुरूला मोठा धक्का दिला. सॉल्टने ३२ चेंडूत ४ चौकार आणि ५ षटकारांसह ६२ धावांची खेळी केली.
सॉल्टच्या विकेटमुळे बंगळुरू दबावात आले. पण इम्पॅक्ट प्लेअर रजत पाटिदार आणि प्रभारी कर्णधार जितेश शर्मा यांनी डान सावरताना चांगला खेळ करत बंगळुरूच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या.
मात्र १६ व्या षटकात पाटिदारला गोलंदाज इशान मलिंगाने डायरेक्ट थ्रो करत धावबाद केले. रजतने १६ चेंडूत १८ धावा केल्या. याच षटकात बंगळुरूला इशान मलिंगाने दुसरा धक्का दिला. त्याने त्याच्याच गोलंदाजीवर रोमारियो शेफर्डचा झेल घेतला आणि त्याला पहिल्याच चेंडूवर शून्यावर माघारी धाडले.
त्याच्या पुढच्याच षटकात आक्रमक खेळणाऱ्या जितेश शर्माला जयदेव उनाडकटने अभिनव मनोहरच्या हातून झेलबाद करत हैदराबादच्या विजयाच्या आशा उंचावल्या.
त्यानंतर १८ व्या षटकात टीम डेव्हिडलाही इशान मलिंगनेच १ धावेवर बाद केले, तर १९ व्या षटकात कृणाल पांड्याला ८ धावांवर आणि भुवनेश्वर कुमारला ३ धावांवर पॅट कमिन्सने माघारी धाडले. शेवटच्या षटकात यश दयालला हर्षल पटेलने अनिकेत वर्माच्या हातून झेलबाद करत बंगळुरूचा डाव संपवला.
हैदराबादकडून गोलंदाजी करताना कर्णधार कमिन्सने ३ विकेट्स घेतल्या, तर इशान मलिंगाने २ विकेट्स घेतल्या. याशिवाय जयदेव उनाडकट, हर्षल पटेल, हर्षल दुबे आणि नितीश कुमार रेड्डी यांनी प्रत्येकी १ विकेट घेत महत्त्वाचे योगदान दिले.
तत्पुर्वी, बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी केली. हैदराबादने २० षटकात ६ बाद २३१ धावा केल्या. हैदराबादकडून इशान किशनने ४८ चेंडूत नाबाद ९४ धावांची दणदणीत खेळी केली. त्याने ७ चौकार आणि ५ षटकार मारले.
याशिवाय अभिषेक शर्माने १७ चेंडूत ३४ धावांची खेळी केली. हेन्रिक क्लासेनने १३ चेंडूत २४ धावा, अनिकेत वर्माने ९ चेंडूत २६ धावा आणि कर्णधार पॅट कमिन्सने ६ चेंडूत नाबाद १३ धावा करत महत्त्वाचे योगदान दिले.
बंगळुरूकडून गोलंदाजी करताना रोमारिओ शेफर्डने २ विकेट्स घेतल्या, तर सुयश शर्मा, लुंगी एनगिडी, भुवनेश्वर कुमार आणि कृणाल पांड्या यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.