Nashik Farmers Protest : “जमिनीसाठी अंग झाकलं नाही!” - शेतकऱ्यांचा अर्धनग्न मोर्चा नाशिककडे
esakal May 24, 2025 09:45 PM

इगतपुरी शहर- औद्योगिक वसाहतीसाठी जमीन देण्यास विरोध दर्शविण्यासाठी तालुक्यातील मौजे आडवण व पारदेवी येथील शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर अर्धनग्न मोर्चा शुक्रवारी (ता. २३) रवाना झाला. यात माजी आमदार पांडुरंग गांगड व काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस भास्कर गुंजाळ यांच्या नेतृत्वाखाली आडवण ते जिल्हाधिकारी कार्यालय असा पायी अर्धनग्न मोर्चा महामार्गावरून नाशिककडे निघाला.

जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला न्याय दिला नाही तर हाच अर्धनग्न मोर्चा मंत्रालयावर काढण्यात येईल, असा इशारा माजी आमदार गांगड व काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस गुंजाळ यांच्यासह संतप्त शेतकऱ्यांनी या वेळी दिला.

वडिलोपार्जित शेतजमिनी औद्योगिक वसाहतीसाठी देण्यास शेतकऱ्यांचा विरोध आहे. शासनाने तालुक्यात अनेक प्रकल्प आणून शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचे काम केले आहे. याआधीच अनेक प्रकल्प तालुक्यात असताना शासन पुन्हा औद्योगिक वसाहतीचा घाट घालत आहे.

शेतकरी भूमिहीन झाला तर नागरिक काय कंपन्या खातील का, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला. या मोर्चात तुकाराम बाबा, नवनाथ कोकणे, नामदेव कोकणे, पंढरीनाथ शेलार, रामा कोकणे, रोहिदास शेलार, सुरेश कोकणे, नितीन पुंदे, रमेश कोकणे, मधुकर गुंजाळ, काळू रेरे, विसराम शेलार, रामदास रेरे, पप्पू कोकणे, दत्तू कोकणे, तुकाराम कोकणे, रमेश कोकणे, ज्ञानेश्वर कोकणे, सुनील पुंडे, कृष्णा शेलार, शिवाजी कोकणे, सुरेश करवर, मनीषा कोकणे, उषा कोकणे, सुमन कोकणे, मनीषा पुंडे, शांताबाई कोकणे, सुनीता कोकणे, हिराबाई कोकणे, सुगंधा कोकणे, लीलाबाई कोकणे यांच्यासह शेकडो ग्रामस्थ सहभागी झाले होते.

‘शेतकऱ्यांना भूमिहीन करू नका’

तालुक्यात रेल्वे, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग, अनेक धरणे, डिझेल-पेट्रोल लाइन, राष्ट्रीय महामार्ग यासाठी जवळपास शासनाने ८० टक्के जमिनी संपादित केल्या आहेत. आतातरी शेतकऱ्यांना भूमिहीन करू नका. शेतकरी आता आक्रमक झाले असून, आता जमिनींची मोजणी करू नये यासाठी शेतकरी एकवटले आहेत. आमच्या जमिनीच्या सातबारावर घेतलेल्या नोंदी रद्द करून कमी करण्यात याव्यात यासाठी शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात जोरदार घोषणाबाजी केली.

सामुदायिक आत्महत्येचा इशारा

शासनाने जमीन मोजणी त्वरित थांबवून सातबारावर घेतलेल्या नोंदी तत्काळ रद्द करण्यात आल्या पाहिजेत, अशी मागणी आडवण व पारदेवी येथील शेतकऱ्यांची आहे. औद्योगिक वसाहतीसाठी शासनाने बळजबरीने जमिनी संपादित करण्याचा घाट घातला तर येथील शेतकरी सामुदायिक आत्महत्या करतील, असा इशारा गाव बचाव समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कोकणे व उपाध्यक्ष विष्णू कोकणे यांनी दिला. भरउन्हात आडवण ते नाशिक निघालेल्या अर्धनग्न मोर्चात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.