Kolhapur Accident : टेंबलाई उड्डाणपुलाजवळ डंपरखाली सापडून मेहंदी आर्टिस्ट जागीच ठार; दुचाकीवरून रस्ता ओलांडताना अपघात
esakal May 24, 2025 09:45 PM

कोल्हापूर : टेंबलाई उड्डाणपुलाजवळ (Temblai Flyover) महापालिकेच्या कचरा डंपरच्या धडकेत चाकाखाली सापडून दिनेशसिंग साहबसिंग नायक (वय ३३, रा. टाकाळा, मूळ रा. सादाबाद, जि. हातरस, उत्तर प्रदेश) जागीच ठार झाला. मेहंदी आर्टिस्ट (Mehndi Artist) असणारा दिनेशसिंग टीव्हीएस शोरूमसमोरून रस्ता ओलांडत असताना डंपरने त्याला धडक दिली.

काल सकाळी साडेअकराच्या सुमारास झालेल्या अपघातानंतर टेंबलाई उड्डाणपुलावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. अपघातप्रकरणी डंपरचालक अमित आकाराम पाटील (वय ३५, रा. प्रगतीनगर, पाचगाव) याच्यावर शाहूपुरी ठाण्यात (Shahupuri Police Station) गुन्हा दाखल झाला.

घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, दिनेशसिंग हा सकाळी साडेअकराच्या सुमारास कामानिमित्त बाहेर पडला होता. टेंबलाई उड्डाणपुलाजवळ दुचाकीवरून रस्ता ओलांडत असताना कसबा बावडा झूम प्रकल्पाकडे जाणाऱ्या डंपरने त्याला समोरून धडक दिली. तो तोल जाऊन खाली कोसळला. डंपरचे चाक त्याच्या पोटावरून गेल्याने तो जागीच ठार झाला.

मृत दिनेशसिंग हा मेहंदी आर्टिस्ट म्हणून काम करत होता. शहरातील मॉलमध्ये तसेच खासगी कार्यक्रमांमध्येही तो मेहंदी काढण्यासाठी जात होता. सध्या तो टाकाळा परिसरात खोली घेऊन राहण्यास होता. त्याचा अपघात झाल्याची माहिती मिळताच कोल्हापुरात राहणारे त्याचे मित्र, नातेवाईक सीपीआरमध्ये जमले. दिनेशसिंगच्या मागे पत्नी, तीन मुले असा परिवार असून, ते सर्वजण मूळ गावी राहण्यास आहेत.

तासभर वाहतूक कोंडी

टेंबलाई उड्डाणपुलाजवळ झालेल्या अपघाताच्या ठिकाणी पोलिस पोहोचेपर्यंत पुलापासून शिवाजी विद्यापीठ रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. राजारामपुरीतून कावळा नाक्याकडे जाणारी वाहतूकही खोळंबली होती. बीएसएनएल टॉवरसमोरही उचगावकडून आलेल्या वाहनांना थांबून राहावे लागल्याने सर्वच रस्त्यावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. तासाभरानंतर वाहतूक सुरळीत करण्यात यश आले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.