इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी ही निवड करण्यात आली आहे. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 च्या दृष्टीने महत्त्वाची आहे. या मालिकेत टीम इंडियाला विजयी टक्केवारी व्यवस्थित ठेवण्याचं आव्हान आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीने निवृत्ती घेतल्यानंतर बीसीसीआयने कसोटी संघाची सूत्र शुबमन गिलकडे सोपवली आहेत. शुबमन गिलच्या नेतृत्वातील संघात नितीश कुमार रेड्डी याचाही समावेश आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून ख्याती असलेला नितीश कुमार रेड्डी या निवडीमुळे खूश आहे. पण दुसरीकडे, त्याला एका बातमीने धक्का बसला आहे. त्याचं नाव वापरून सोशल मीडियावर फसवणूक होत असल्याचं समोर आलं आहे. यानंतर त्याने सोशल मीडियावर चाहत्यांना याबाबत आवाहन केलं आहे. नितीशने त्याच्या ‘एक्स’ अकाउंटवर चाहत्यांना आवाहन केले आणि त्यांना बनावट अकाउंटना बळी पडू नका असे सांगितले.
नितीश कुमार रेड्डीने लिहिले की, “माझ्या मित्रांनो, गेल्या काही काळापासून मला असे अनेक मेसेज येत आहेत की माझ्या नावाने अनेक अकाउंट चालवले जात आहेत. मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे माझे खरे अकाउंट आहे. म्हणून कृपया माझ्या नावाने चालवल्या जाणाऱ्या इतर प्रोफाइलमध्ये सामील होऊ नका आणि त्यांची तक्रार करा.”
फेक अकाउंटचा सामना करणारा नितीश कुमार रेड्डी हा एकमेक क्रिकेटपटू नाही. सोशल मीडियावर मागच्या काही वर्षात फेक अकाउंट तयार करून फसवणूक करण्याचे अनेक प्रकार घडत आहेत. अनेकदा सेलिब्रिटींची खरं अकाउंट असल्याचं चाहते गृहीत धरतात. यामुळे फसवणूक होण्याची शक्यता असते. अनेकदा फसवणूकही झाली आहे. पण नितीश कुमार रेड्डीने पुढे येत याबाबत खुलासा केला आहे. त्यामुळे बनावट खात्याला चाहते बळी पडणार नाहीत.
दुसरीकडे, नितीश कुमार रेड्डीला आयपीएल 2025 पर्व काही खास गेलं नाही. सनरायझर्स हैदराबादचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. त्यात 12 सामन्यात त्याने फक्त 182 धावा केल्या आहेत. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यात त्याला सूर गवसेल ना अशी प्रार्थना आता चाहते करत आहेत.