आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 66 व्या सामन्यात पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर याने दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध तडाखेदार खेळी. श्रेयसने जयपूरमधीर सवाई मानसिंह स्टेडियममध्ये पहिल्या डावात बॅटिंग करताना अर्धशतक झळकावलं. श्रेयसने केलेल्या या खेळीमुळे अखेरच्या क्षणी मार्क्स स्टोयनिस याने दिलेल्या फिनिशिंग टचमुळे पंजाबला 200 पार मजल मारता आली. तसेच श्रेयसने या अर्धशतकासह 2 फलंदाजांना मागे टाकलं. श्रेयस यासह 18 व्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत 10 व्या स्थानी येऊन पोहचला.
श्रेयसने दिल्ली विरुद्ध डावातील 17 व्या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर फोर ठोकला. श्रेयसने यासह अर्धशतक पूर्ण केलं. श्रेयसने 33 बॉलमध्ये 160.61 च्या स्ट्राईक रेटने अर्धशतक पूर्ण केलं. श्रेयसने या खेळीत 2 सिक्स आणि 5 फोर लगावले. श्रेयसचं हे आयपीएलच्या कारकीर्दीतील 26 वं तर 18 व्या हंगामातील पाचवं अर्धशतक ठरलं. श्रेयसने 53 धावांच्या खेळीसह लखनौ सुपर जायंट्सचा एडन मारक्रम आणि सहकारी प्रभसिमरन सिंग या दोघांना 18 व्या मोसमात सर्वाधिक धावा करण्याबाबत मागे टाकलं.
श्रेयस अय्यर याने 18 व्या मोसमात आतापर्यंत 13 सामन्यांमधील 13 डावांत 172.43 च्या स्ट्राईक रेटने आणि 48.80 च्या सरासरीने 283 बॉलमध्ये एकूण 488 धावा केल्या आहेत. श्रेयसची या हंगामातील नाबाद 97 ही सर्वोच्च खेळी ठरली आहे.
पंजाबने दिल्लीला विजयासाठी 207 धावांचं आव्हान दिलंय. दिल्लीने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 206 रन्स केले. दिल्लीसाठी श्रेयस व्यतिरिक्त मार्क्स स्टोयनिस याने 16 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 3 फोरसह नॉट आऊट 44 रन्स केल्या. तर जोश इंग्लिस याने 32 तर प्रभसिमरन सिंह याने 28 धावांचं योगदान दिलं.
दिल्ली कॅपिट्ल्सचा हा या मोसमातील साखळी फेरीतील शेवटचा सामना आहे. दिल्लीने आतापर्यंत एकूण 13 पैकी 6 सामने जिंकले आहेत. त्यामुळे दिल्लीचा हा सामना जिंकून विजयी शेवट करण्याचा प्रयत्न असणार आहे. दिल्लीला या प्रयत्नात किती यश येतं? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.
दरम्यान पंजाब किंग्सने प्लेऑफसाठी क्वालिफाय केलं आहे. मात्र आता पंजाब पॉइंट्स टेबलमध्ये टॉप 2 मध्ये राहण्यासाठी प्रयत्नशील आहे. टॉप 2 मध्ये असणाऱ्या संघांना अंतिम फेरीत पोहचण्यासाठी 2 संधी मिळतात. त्यामुळे प्लेऑफसाठी पात्र ठरलेल्या संघात टॉप 2 साठी चुरस आहे. ताज्या आकडेवारीनुसार, पंजाबने 12 पैकी 8 सामने जिंकले आहेत. पंजाबचा 1 सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. तर 3 सामन्यात पंजाबचा पराभव झाला. पंजाब एकूण 17 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी आहे.