वीजचोरी प्रकरणी व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल
esakal May 25, 2025 01:45 AM

मुरूड, ता. २४ (बातमीदार) ः कल्याण भरारी पथक व मुरूड महावितरणतर्फे बाजारपेठेतील व्यापारी दिलीप जैन यांच्या मालकीच्या फर्निचर व इलेक्ट्रॉनिक्स महावीर शॉपसह घरातील वीजमीटरची तपासणी केली असता त्यात फेरफार केल्याचे उघड झाले आहे.
मुरूडमधील महावितरणचे प्रभारी सहाय्यक अभियंता सतीश खरात यांनी कार्यकारी अभियंता प्रदीप डालू व उपकार्यकारी अभियंता कृष्णात सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव पोलिस ठाण्यात वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्याण भरारी पथकातील कर्मचारी व मुरूड महावितरण कंपनीतील अधिकारी व कर्मचारी यांच्या संयुक्त मोहिमेद्वारे मुरूड बाजारपेठेतील दुकान व घरगुती मीटरची तपासणी करण्यात आली. तपासादरम्यान जैन यांच्या मालकीचे फर्निचरचे दुकान व दुमजली घरामध्ये अनधिकृत वीजजोडणी केल्याचे आढळले. प्रत्यक्ष वीजमीटर तपासणी केली असता, त्यात फेरफार करून वीजचोरी करीत असल्याचे आढळले. दुकानातील वीजचोरीप्रकरणी सुमारे एक लाख ९५ हजार व घरातील वीजचोरीप्रकरणी सुमारे सहा लाख रुपये दंड आकारण्यात आला आहे.

दंडात्मक कारवाई
मुरूड शहर व ग्रामीण भागातील नागरिकांनी वीजचोरी करू नये. दिलीप जैन यांनी दोन्ही मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी केल्याचे आढळून आले आहे. त्यांना दंड करण्यात आला आहे. महावितरणचे कार्यक्षेत्र माणगाव असल्याने तिथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपासासाठी मुरूड पोलिस ठाण्यात वर्ग होणार असल्याची माहिती मुरूड महावितरण कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता कृष्णात सूर्यवंशी यांनी दिली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.