राज्याच्या विकासात मत्स्यव्यवसायाचे मोठे योगदान
esakal May 25, 2025 01:45 AM

उरण, ता. २४ (वार्ताहर) : राज्याच्या विकासात मत्स्यव्यवसायाचा मोठा वाटा आहे. त्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या कोळी समाजाला महायुती सरकार नक्की न्याय देईल, असा विश्वास राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरविकास मंत्री नीतेश राणे यांनी व्यक्त केला.
मत्स्यव्यवसायाला राज्य सरकारने कृषी क्षेत्राचा दर्जा दिल्याबद्दल करंजा येथील कोळी बांधवांनी शुक्रवारी (ता. २३) सायंकाळी नीतेश राणे यांच्या सत्कारासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमात मंत्री नीतेश राणे बोलत होते. कोळी समाजाला उदरनिर्वाहासाठी मासेमारी करणे हाच मुख्य व्यवसाय आहे; मात्र त्यासाठी त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. त्यातच नैसर्गिक आपत्ती आली तर त्यांना आपल्या मासेमारी बोटी बंदरात उभ्या करून ठेवाव्या लागतात. म्हणून राज्य सरकारने मत्स्यव्यवसायाला कृषी क्षेत्राचा दर्जा देऊन कोळी समाजाला आर्थिक संरक्षण देण्याचे काम केले आहे. त्यामुळे राज्याच्या मासेमारी व्यवसायात दुपटीने वाढ होईल, असे नीतेश राणे यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमासाठी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, मत्स्य आयुक्त नागनाथ बागवे, परवाना अधिकारी सुरेंद्र बागुलगावे, भाजप उरण तालुका महिला आघाडी अध्यक्षा राणी म्हात्रे, तालुकाध्यक्ष धनेश गावंड, माजी नगराध्यक्ष रवी भोईर, कौशिक शहा, माजी नगराध्यक्षा सायली म्हात्रे, जयवीन कोळी, मंगेश वाकडीकर, रमेश नाखवा आदी मान्यवरांसह नागरिक उपस्थित होते.
--------------
करंजा बंदर होणार जागतिक कीर्तीचे
करंजा येथे सुमारे १५० कोटी खर्च करून उभारलेले मासेमारी बंदर येत्या काही वर्षांत जागतिक कीर्ती प्राप्त करेल. या बंदरासाठी लागणारा आवश्यक निधी राज्य सरकार तत्परतेने देईल. सध्या सुरू असलेल्या करंजा-रेवस पुलासाठी बाधित होणाऱ्या प्रत्येक नागरिकाला न्याय देऊ, असा विश्वास मंत्री नीतेश राणे यांनी व्यक्त केला.
----------------------
दिलेला शब्द पाळला!
करंजा गावातील कोळी बांधवांनी यापूर्वी ज्या राजकीय पक्षांना मतदान केले त्यांनी या जनतेला नेहमी उपेक्षित ठेवले; मात्र मी आमदार होण्यापूर्वी या जनतेला तुम्हाला जागतिक कीर्तीचे अद्ययावत मासेमारी बंदर देईन, असा शब्द दिला होता. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्याने करंजा येथे १५० कोटी निधी खर्च करून अद्ययावत मासेमारी बंदर निर्माण केले. त्यामुळे येथील मासेमारी करणाऱ्या बांधवांना मोठा फायदा झाला आहे. मी शब्द देतो तो पूर्ण करतो, असे उरणचे आमदार महेश बालदी यांनी सांगितले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.