अलिबाग, ता. २४ : अलिबाग-वडखळ मार्गावर शनिवारी (ता. २४) सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. महिन्याचा चौथा शनिवार, रविवार या सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-पुण्याच्या पर्यटकांनी अलिबाग, मुरूडकडे धाव घेतली आहे तसेच लग्नाचा हंगाम असल्याने लग्नासाठी जाणाऱ्या वऱ्हाडी मंडळींची मार्गावर गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. अशीच गर्दी गेट वे-मांडवा या जलमार्गावरही दिसून येत आहे. पावसाळ्यासाठी २६ मेपासून प्रवासी जलवाहतूक बंद होणार आहे. शनिवारी जलमार्गाने प्रवास करणाऱ्यांचीही मोठी गर्दी झाली होती.
पर्यटकांची वाहनांच्या गर्दीमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे अनेकांना इच्छित स्थळी पोहोचण्यास विलंब झाला. काही वाहनचालकांनी हलगर्जी करत अरुंद रस्त्यावर समोरासमोर वाहने आणल्याने जागोजागी वाहतूक ठप्प झाली आहे. कोंडी नियंत्रणासाठी पोयनाडपासून धरमतरपर्यंत फक्त एकच वाहतूक कर्मचारी तैनात असल्याने त्यांची दमछाक झाली. कोंडीत अडकलेली रुग्णवाहिकेला मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागली. काही मिनिटांच्या प्रवासासाठी दोन ते तीन तासांपेक्षा जास्त वेळ लागल्याने अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला.