वेबसीरिज- पारिवारिक मनोरंजन
Marathi May 25, 2025 08:25 AM

>> तारंग वैद्य ([email protected]))

ताराचंद बडजात्या यांनी 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्यदिनी ‘राजश्री प्रोडक्शन’ ही चित्रपट वितरण संस्था सुरू केली. अनेक चित्रपट निर्माण करत त्यांनी भारतीय संस्कार जपणारे, कुठलीही अश्लीलता नसणारे, आशयघन चित्रपट देऊन मान आणि पैसा कमावला. त्यांच्या पुढच्या पिढीने त्यांचा हा वारसा कायम ठेवत यशाची कमान उंच ठेवली आहे. टीव्ही माध्यमाचे वर्चस्व वाढल्यावर राजश्रीने अनेक मालिका बनवल्या. ‘बडा नाम करेंगे’ ही वेब सीरिज घेऊन सूरज बडजात्या आता ओटीटीवरही आले आहेत. संपूर्ण परिवारासह पाहू शकता येणारी ही मालिका असून परिवारातील प्रत्येक वयोगटाला आवडेल अशी आहे.

रतलाम येथे ‘श्री गंगा मिष्ठान्न’ची मिठाई रतलाम, उज्जैन, इंदूर सगळीकडेच खूप प्रसिद्ध. हे प्रतिष्ठित दुकान राठी परिवाराच्या मालकीचे. दोघे भाऊ मिळून हा व्याप सांभाळत असतात आणि एका भव्य बंगल्यात सर्व एकत्र राहत असतात. यांचा धाकटा मुलगा रिषभ मुंबईत शिकायला असतो. मुंबईत त्याचा स्वतचा फ्लॅट असतो. कथा इथूनच सुरू होते.

रिषभ आपल्या घरी मित्रांसाठी एक पार्टी ठेवतो. तो कोविडचा अगदी सुरुवातीचा काळ असतो. पार्टी संपता संपता ‘लॉकडाऊन’ची घोषणा होते, एकच पळापळ होते आणि सगळे आपापल्या घराकडे निघतात. रिषभच्या मैत्रिणीची मैत्रीण सुरभी ही पार्टीत आलेली असते आणि मद्याच्या अमलाखाली झोपी गेलेली असते हे रिषभला माहीत नसते. सकाळी जेव्हा दोघांना जाग येते, तेव्हा दोघे दचकतात, एकमेकांना दोष देतात, पण परिस्थिती अशी असते की, सुरभीला तिच्या हॉस्टेलमध्ये जायची व्यवस्था होईपर्यंत तिला रिषभच्या घरात राहणे भाग असते. पाचव्या दिवशी तिच्या हॉस्टेलची गाडी येऊन तिला घेऊन जाते.

काही महिन्यांनंतर रिषभ आपल्या घरी रतलामला जातो. तिथे त्याच्यासाठी उज्जैनचे एक स्थळ येते. घरच्यांना परिवार आणि मुलगी पसंत असते. त्यामुळे ‘बघायचा’ कार्यक्रम ठरतो. मुलीला पाहून रिषभ चकित होतो आणि आनंदितही होतो. कारण ती सुरभी असते. मुंबईत दोघांचे प्रेम जमले असते, पण इथे परिस्थिती काहीशी अशी असते की, दोघे एकमेकांची पसंती दर्शवतात, पण आम्ही एकमेकांना आधीपासून ओळखतो हे सांगू शकत नाहीत.

राठी परिवाराच्या मूल्यांमध्ये ‘झूठ बोलना’ पाप मानले जाते आणि त्यासाठी क्षमा नसते. रिषभला हे माहीत असल्यामुळे आपण सुरभीला आधीपासून ओळखतो हे न सांगून आपण परिवाराचा विश्वास तोडला ही खंत त्याच्या मनात असते. हेच ‘खोटं बोलणं’ पुढे दोघांना भारी पडते. कारण म्हणतात ना सत्य आणि सूर्य कधीच लपत नाही. हे सत्य उघडकीला येते का…आणि आले तर त्याचे काय परिणाम होतात हे बघायचे असेल तर भारतीय संस्कार मूल्य जपणारी ‘बडा नाम करेंगे’ ही सोनी लिव्हवर 7 फेब्रुवारी 2025 पासून आलेली वेब सीरिज बघा. पहिले आठ भाग 35 ते 48 मिनिटांचे असून शेवटचा भाग एक तास बावीस मिनिटांचा आहे. पहिले आठ भाग तर चांगले आहेतच, पण शेवटचा भाग एवढा मोठा असूनही क्षणभरही कंटाळवाणा होत नाही. उलट आपल्याला भावनाप्रधान करून टाकतो. आज वेब सीरिज म्हणजे असा प्लॅटफॉर्म जिथे सेन्सॉरचे बंधन नाही आणि रिमोट प्रेक्षकांच्या हाती. तिथे शुद्ध, पवित्र, नीतिमूल्यांचे महत्त्व अधोरेखित करणारी मालिका आणणे हिमतीचे काम. ही हिंमत बडजात्यांनी दाखवली असून त्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. त्यामुळे ते वेब सीरिजच्या विश्वातही ‘बडा नाम करेंगे’ हे निश्चित.

रिषभ (रितिक घनशानी) ने चांगला अभिनय केला आहे, तर सुरभी (आयेशा कडुस्कर) उत्तम. सोबत दोघांचा परिवार आहे ज्यात राजेश जैस, चैत्राली गुप्ते, दीपिका अमीन, अंजना सुखानी, अलका अमीनसारखी नावे आहेत. सर्वच कलाकारांची निवड योग्य आहे. बहिणीची काळजी करणारा ज्ञानेंद्र त्रिपाठी आपलासा वाटतो. ‘गुल्लक’मुळे प्रसिद्धीझोतात आलेले जमील खान इथे आपली भूमिका मन लावून करताना दिसतात. उंचापुरा, देखणा कंवलजीत सिंग हिंदी सिनेमा आणि टेलिव्हिजनमधील मोठे नाव या मालिकेत ते मोठय़ा भावाच्या मध्यवर्ती भूमिकेत आहेत. इथे त्यांनी उत्कृष्ट अभिनयाचा नमुना पेश केला आहे. शेवटचा भागात ते आपल्याला गहिवरून टाकतात.

सूरज बडजात्यांनी दृश्यांमधील भव्यता कायम ठेवली आहे. रतलाम, उज्जैन शहरांचे चित्रीकरण छान आहे. कथेमध्ये वेगळेपण नसले तरी सादरीकरण निश्चितच प्रभावी आहे. मालिकेतील गाणी कर्णमधुर आहेत. संपूर्ण परिवारासहित तुम्ही ही मालिका बघू शकता आणि परिवारातील प्रत्येक वयोगटाला ही मालिका आवडेल अशी आहे हे नक्की! त्यामुळे वाट कोणाची बघताय.

(लेखक सिनेदिग्दर्शक व पटकथाकार आहेत)

वेब मालिका: मूल्यासह कौटुंबिक मनोरंजन – 'बडा नाम केंगे

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.