माजी नगरसेवक सानप यांचा शिंदे गटात प्रवेश
विरोधकांच्या आरोपांना कामांतून उत्तर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : नाशिकचे माजी आमदार नरेंद्र दराडे तसेच मुंबईतील ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका सुजाता सानप यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. ‘विरोधकांच्या आरोपांना आणि टीकेला आरोपाने नाही, तर कामांतून उत्तर दिले, त्यामुळेच राज्याचा मुख्यमंत्री बनू शकलो, असे प्रतिपादन या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
मुक्तागिरी निवासस्थानी शुक्रवारी (ता. २३) रात्री उशिरा हा पक्षप्रवेश झाला. या वेळी शिवसेना सचिव राम रेपाळेंसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. येवला येथील माजी आमदार नरेंद्र दराडे यांच्यासह डॉ. सुधीर जाधव, उत्तमराव आहेर, अजय जैन, दयानंद जावळे, नगरसेवक अंबादास कस्तुरे यांच्यासह ठाकरे गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. तसेच मुंबईतील ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका सुजाता सानप, कुलाबा विधानसभा संघटक गणेश सानप, जगदिश मथणे, अनिल वाळुंज, शरद वाघ, अभिषेक वाघ, फैजल कुरेशी, शुभम पेढांबकर यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. या वेळी उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ‘अडीच वर्ष सरकारने जे काम केले ते जनतेने पाहिले. शिवसेना दिलेला शब्द पाळते आणि बाळासाहेबांचा विचार पुढे नेत आहे.’ सुजाता सानप आणि गणेश सानप यांनी सुचवलेली विकासकामे पूर्ण करू, अशी ग्वाही या वेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
..
महायुतीचाच भगवा फडकेल!
‘मुंबई महापालिकेतील ठाकरे गटाचे जवळपास ६५ नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले आहेत. त्याचबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मिळून नगरसेवकांची मोठी फौज शिवसेनेत आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचाच भगवा फडकेल’, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.