Rahul Gandhi : मी पीडित कुटुंबांच्या पाठीशी : काँग्रेस नेते राहुल गांधी; 'काश्मीरमधील वेदना राष्ट्रीय स्तरावर मांडणार'
esakal May 25, 2025 01:45 PM

पूँच : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शनिवारी जम्मू-काश्मीरमधील पूँचचा दौरा केला. पाकिस्तानच्या गोळीबारात मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. ‘या कुटुंबांची झालेली हानी ही मोठी शोकांतिका आहे. पीडित कुटुंबांच्या पाठीशी मी ठामपणे उभा असून त्यांच्या वेदना दुःख आणि त्यांचे प्रश्न राष्ट्रीय पातळीवर उपस्थित करणार असल्याचे ते म्हणाले.

सीमेवरील पूँच गावात पाकिस्तानने सात ते दहा मे या काळात केलेल्या गोळीबारात अनेक जणांचा बळी गेला आहे. त्यांच्या कुटुंबांतील सदस्यांची भेट घेऊन राहुल गांधी यांनी त्यांच्याशी चर्चा केली. शालेय मुलांशीही त्यांनी संवाद साधला. गेळीबारीत पडझड झालेल्या घरांचीही त्यांनी पाहणी केली. साधारण एक तास ते तेथे होते. याबाबत पत्रकारांशी बोलताना गांधी म्हणाले, ‘‘ही खूप मोठी शोकांतिका आहे. अनेक जणांचे जीव गेले आहेत. त्यांनी (पाकिस्तानी सैनिक) नागरी वस्तीवर थेट हल्ला केला. लोकांशी बोलून त्यांच्या समस्या मी जाणून घेतल्या. त्यांच्या प्रश्नांवर राष्ट्रीय पातळीवर आवाज उठवावा, अशी मागणी त्यांनी केली असून ती पूर्ण करेन.’’

‘एक्स’वर लिहिलेल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे, की आज पूँचमध्ये पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात जीव गमावलेल्या लोकांच्या कुटुंबातील सदस्यांना भेटलो. पडलेली घरे, विखुरलेले सामान, डोळ्यात अश्रू आणि प्रत्येक कोपऱ्यात जिवलगांना गमावल्याचे दुःख सामावले होते. हे देशभक्त कुटुंबे प्रत्येक लढाईचा सर्वांधिक बोजा उचलून धाडस आणि अभिमानाने उचलतात. त्यांच्या धैर्याला वंदन. पीडित कुटुंबांच्या पाठीशी ठामपणे उभा असून त्यांच्या मागण्या आणि मुद्दे राष्ट्रीय पातळीवर नक्की उपस्थित करीन. राहुल गांधी यांच्यासह पक्षाचे जम्मू-काश्मीरचे प्रदेश अध्यक्ष तारिक हमीद कार्रा, पक्षाचे सरचिटणीस जी.ए.मीर आणि अन्य वरिष्ठ नेते होते. पहलगामधील दहशतवादी हल्ल्यानंतरचा हा त्यांचा दुसरा काश्मीर दौरा होता.

मुलांना दिला धीर

पूँचमधील शालेय मुलांचीही राहुल गांधी यांनी भेट घेतली. त्यांची विचारपूस करून धीर दिला. मुलांशी बोलताना ते म्हणाले, ‘‘मी तुमच्यावर खूप प्रेम करतो. लवकरच सर्व काही सुरळीत होईल. या परिस्थितून बाहेर पडण्यासाठी तुम्ही मन लावून अभ्यास करा, खूप खेळा आणि शाळेत अनेक मित्र बनवा.’’

पाकिस्तानच्या गोळीबारात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना भेटून त्यांच्या वेदना जाणून घेणारे आणि त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे राहुल गांधी हे पहिले राष्ट्रीय नेते आहेत.’’

- तारिक हमीद कार्रा, प्रदेशाध्यक्ष, जम्मू-काश्मीर काँग्रेस

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.