मुंबई : ‘‘राज्यात २०१९ मधील निवडणुकीपूर्वीच भाजप सोबत जाण्याच्या निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी भाजपने शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली होती. मात्र निवडणुकीचा रोख पाहून शरद पवार यांनी भाजपबरोबर जाण्यास नकार दिला,’’ असा गौप्यस्फोट मंत्री छगन भुजबळ यांनी केला. साम टीव्हीच्या ‘ब्लॅक अँड व्हाइट या मुलाखतीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
भुजबळ म्हणाले, ‘‘मी तुरुंगामध्ये असताना २०१७ मध्ये भाजपबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसने जावे याबद्दल चर्चा झाली. ही चर्चा एका उद्योगपतीच्या उपस्थितीत झाली. यात मंत्रिमंडळ, खाते वाटपही ठरले होते. हे सर्व शरद पवार यांच्या संमतीनेच सुरू होते. यासाठी भाजपने शिवसेनेला सोडावे, अशीही अट घालण्यात आली होती. भाजपने यास नकार दिला. त्यामुळे ही चर्चा पुढे झाली.’’
‘‘२०१९ मधील विधानसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा चर्चा झाली. त्यावेळी शरद पवार, प्रफुल्ल पटेल, अजित पवार आणि भाजपची काही मंडळी होती. या चर्चेत मी नव्हतो. त्यावेळी भाजप - राष्ट्रवादी असे सरकार स्थापन करण्याचा निर्णय झाला. यासाठी भाजपने शिवसेनेला सोडले. मात्र निवडणुकीच्या निकालानंतर राज्याचा रोख पाहून शरद पवारांनी भाजपबरोबर जाण्यास नकार दिला,’’ असा गौप्यस्फोट भुजबळ यांनी केला. या बैठकीत शरद पवारांबरोबर अजित पवार होते. शरद पवार यांचे काय, असा प्रश्न भाजपने केला. यावर, अजित पवार यांनी आपण सोबत असल्याचे स्पष्ट करत, भूमिका बदलणार नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान त्यादिवशी सकाळी जो काही शपथविधी झाला, तो अजित पवार यांनी दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी केला, असे भुजबळ यांनी सांगितले.
पुन्हा चर्चा फिसकटलीते म्हणाले, की भाजपबरोबर आम्हाला जायचे होते. त्यासाठी शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल, अजित पवार, जयंत पाटील यांच्याकडे चिठ्ठी दिली होती. त्यात कोणकोण मंत्रिपदी हवे, कोण कोणती कामे झाली पाहिजेत याची माहिती होती. त्यानंतर इंदूरपुढे बडोदे येथे जायचा निर्णय झाला होता. त्यासाठी जयंत पाटील शरद पवार यांना भेटले. यावर पवारांनी त्यांना कुठे चाललात, अशी विचारणा केली. तसेच पाहिजे असेल तर ते तुम्हाला भेटतील, असे सांगत या विषयावर पडदा पडला. त्यामुळे पुन्हा एकदा भाजप- राष्ट्रवादी सरकार बनविण्याची चर्चा फिसकटली असल्याचे, भुजबळ यांनी सांगितले.
अजित पवार यांच्याबाबत नाराजीमुलाखतीत भुजबळ यांनी बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांनी खूप मोठी जबाबदारी दिल्याचे मान्य केले. अजित पवार यांनी दोन वेळा राज्यसभा, एक वेळा लोकसभा निवडणूक लढण्यापासून कसे डावलले, तर विधानसभा निवडून आल्यानंतर पुन्हा राजीनामा देण्यास सांगून राज्यसभेची ‘ऑफर’ कशी दिली, याची माहिती भुजबळ यांनी दिली. मंत्रिपदावर डावल्याबद्दल भुजबळ यांनी अजित पवार यांच्याबाबत नाराजी व्यक्त करत या काळात पक्ष सोडण्याचीदेखील इच्छा झाल्याचे त्यांनी बोलून दाखवले.