सोलापूर : विजापूर रस्त्यावरील पनाश लाईफ स्टाईल होम्समधील फ्लॅटची आधीच एकास विक्री केली असताना पुन्हा दुसऱ्यास विक्री करून ३२ लाख ५० हजारांची फसवणूक केली. याप्रकरणी गॅलोर डेव्हलपर्सचे संचालक अमित थेपडे (रा. सोलापूर) यांच्याविरुद्ध विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी महेश पंचप्पा कापसे (वय ४५, रा. बुधवार पेठ, अक्कलकोट) यांनी फिर्याद दिली आहे. गॅलोर डेव्हलपर्सचे संचालक अमित थेपडे यांनी विजापूर रस्त्यावरील पनाश लाईफ स्टाईल होम्समधील ए १ बिल्डिंगमधील फ्लॅट क्रमांक १२०१ ची २९ ऑगस्ट २०२२ रोजी दस्त क्रमांक ४३५५/२०२२ नुसार हार्दिक शहा यांना विकला होता. तरीही त्यांनी ३० डिसेंबर २०२२ रोजी महेश कापसे यांना तो फ्लॅट विकला. त्यापोटी त्यांच्याकडून आरटीजीएसद्वारे ३२ लाख ५० हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक शीतलकुमार गायकवाड तपास करीत आहेत.