शुबमन गिल याची भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली. शुबमन इंग्लंड दौऱ्यातून कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारणार आहे. टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यात एकूण 5 कसोटी सामने खेळणार आहे. शुबमनने कर्णधार होताच मुलाखत दिली. शुबमनने या मुलाखतीत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. तसेच शुबमनने निवृत्त झालेल्या रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याबाबत प्रतिक्रिया दिली. शुबमनने रोहित आणि विराटची कॅप्टन्सी आणि त्यांच्या स्टाईलवर भाष्य केलं आहे. शुबमनची रोहित शर्माच्या जागी कर्णधार म्हणून निवड करण्यात आलीय. शुबमन यासह टेस्ट टीम इंडियाचा 37 वा कॅप्टन ठरला.
शुबमन गिल कर्णधार होताच नव्या जबाबदारीसाठी उत्सूक आहे. मी या प्रवासाची सुरुवात होण्याची प्रतिक्षा करत आहे, असं शुबमनने म्हटलं. टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिकेला 24 जून पासून सुरुवात होणार आहे. टीम इंडियाची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप2025-2027 या साखळीतील इंग्लंड विरुद्धची पहिलीच मालिका असणार आहे.
शुबमनने विराट आणि रोहितबाबत मुलाखतीत काय म्हटलंय? हे जाणून घेण्याची क्रिकेट चाहत्यांची उत्सकूता शिगेला पोहचली आहे. शुबमन या 2 दिग्गजांबाबत काय म्हणालाय? हे जाणून घेऊयात. “रोहित आणि विराट या दोघांची कॅप्टन्सीची शैली तसेच स्वभाव पूर्णपणे वेगळा होता. मात्र दोघांचंही टीम इंडियाला विजय मिळवून देणं हे एकच ध्येय होतं”, असं गिलने नमूद केलं.
“विराट भाई आक्रमक होता. तर रोहित भाई कूल असायचा. मात्र दोघेही खेळाडूंना खेळण्याचं स्वातंत्र्य देण्यात विश्वास ठेवायचे. दोघांच्या नेतृत्वात खेळल्यामुळे मला खूप काही शिकता आलं”, असं शुबमनने सांगितलं. आता शुबमन रोहित आणि विराटकडून शिकलेल्या गोष्टींचा कर्णधार झाल्यानंतर कशाप्रकारे उपयोग करतो, याकडे भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
“रोहित आणि विराटने ब्लू प्रिंट दिली ज्यामुळे टीम इंडियाला सामना आणि मालिका जिंकणं शिकवलं. तसेच अडचणींवर मात कशी करायची, हे देखील या दोघांनी शिकवलं”, असं गिलने सांगितलं.
दरम्यान शुबमनसाठी कर्णधार म्हणून इंग्लंड दौरा आव्हानात्मक असणार आहे. टीम इंडिया पहिल्यांदाच विराट, रोहित आणि आर अश्विन या तिघांशिवाय खेळणार आहे. त्यामुळे शुबमन युवा ब्रिगेडसह इंग्लंडचा कसा सामना करतो? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.