नांदेड : केंद्रीय मंत्री अमित शहा सोमवारी (ता. २६) दुपारी २ वाजता नवा मोंढा, नांदेड येथे भारतीय जनता पक्षाच्या ‘शंखनाद’ जाहीर सभेला संबोधित करतील. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण आदी नेते उपस्थित राहतील, अशी माहिती खासदार अशोक चव्हाण यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, अमित शहा २५ ते २७ मे दरम्यान तीनदिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. नांदेड येथील ‘शंखनाद’ सभेतून ते ऑपरेशन सिंदूर, नक्षलवादाचा बिमोड, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यावर संबोधन करतील.
जिल्ह्यासह परिसरातून किमान ५० हजार लोक येतील, असा दावा चव्हाण त्यांनी केला. पत्रकार परिषदेला राज्यसभा सदस्य डॉ. अजित गोपछडे, भाजप महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर, डॉ. संतुकराव हंबर्डे, प्रवीण साले, विजय गंभीरे आदी उपस्थित होते.
असा आहे दौरासोमवारी दुपारी १.१५ ला श्री गुरू गोविंदसिंगजी विमानतळावर आगमन. १.३० वसंतराव नाईक चौक येथे वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे अनावरण. १.४५ ला विद्युतनगर चौकात खा.डॉ. अजित गोपछडे यांच्या कार्यालयाचे उद्घाटन. दुपारी दोन वाजता ‘शंखनाद’ सभेला संबोधन. सायंकाळी भाजप महानगर कार्यालयाचे उद्घाटन.