Monsoon entry in Maharashtra, rains enter the state 12 days ahead
Marathi May 25, 2025 07:40 PM


दरवर्षी जून महिना संपत आला तरी न येणारा मान्सून यावर्षी मात्र 12 दिवस आधीच महाराष्ट्रात पोहोचला आहे. साधारणतः 7 जूनला महाराष्ट्रात मान्सूनची एन्ट्री होणार, अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली होती. मात्र, आता रविवारीच (ता. 25 मे) मान्सूनने राज्यात हजेरी लावली आहे.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांना अवकाळीचा फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून बळीराजा हवालदिल झाला आहे. पण आता सर्वांनाच सुखावणारी बातमी समोर आली आहे. कारण दरवर्षी जून महिना संपत आला तरी न येणारा मान्सून यावर्षी मात्र 12 दिवस आधीच महाराष्ट्रात पोहोचला आहे. साधारणतः 7 जूनला महाराष्ट्रात मान्सूनची एन्ट्री होणार, अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली होती. मात्र, आता रविवारीच (ता. 25 मे) मान्सूनने राज्यात हजेरी लावली आहे. (Monsoon entry in Maharashtra, rains enter the state 12 days ahead)

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. यंदा तब्बल 12 दिवस आधीच मान्सूनने महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. आज राज्याच्या काही भागांमध्ये मान्सून दाखल झाला आहे. आठवडाभरापूर्वीच मान्सूनचे अंदमान, निकोबार बेटांवर आगमन झाले होते. त्यानंतर मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी अनुकूल वातावरणाची निर्मिती झाली होती. केरळमध्ये देखील मान्सून वेळे आधीच दाखल झाला होता, त्यानंतर आज मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. मुंबई शहर आणि उपनगरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे काही तासांतत मुंबईतही मान्सूनचे आगमन होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा… Maharashtra Weather : केरळात मान्सूनची हजेरी, महाराष्ट्रातही होणार लवकरच आगमन

मान्सूनचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यातील बहुतांश शेतकरी हे खरिपाच्या शेतीसाठी मान्सूनच्या पावसावर अवलंबून असतात. त्यामुळे मान्सूनच्या आगमानाने शेतकरी सुखावले आहेत. तसेच मान्सून आल्याने गेल्या दोन-तीन महिन्यांपासून उकाड्याचा सामना करणाऱ्या सर्वसामान्यांनीही सुटकेचा निश्वास टाकला आहे. यंदा देशासह राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यंदा देशात मान्सूनच्या पावसाचे प्रमाण 107 टक्क्यांच्या आसपास राहू शकते, अशी शक्यताही हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. दरम्यान अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, त्यामुळे पुढील दोन ते तीन राज्यातील अनेक भागांमध्ये हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांमध्ये तसेच कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांच्या काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, नांदेड, लातूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. तर मुंबई आणि ठाण्याला पावसाचा यलो अलर्टही जारी करण्यात आला आहे. अलिबागमधील अनेक समुद्र किनारे आज रविवार असून देखील ओस पडले आहेत. त्यामुळे अनेक व्यावसायिक संकटात सापडले आहेत.



Source link

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.