Education Scam: जामदारांकडून २११ बनावट आयडी; लक्ष्मण मंघामकडून कबुली, पोलिस कोठडीत रवानगी
esakal May 25, 2025 03:45 PM

नागपूर/छत्रपती संभाजीनगर : बोगस शालार्थ आयडी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तत्कालीन उपसंचालक तथा विभागीय शिक्षण मंडळ छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय सचिव वैशाली जामदार यांनी त्यांच्या दोन वर्षांच्या कार्यकाळात २११ बोगस आयडी तयार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यांना शुक्रवारी अटक केल्यावर शनिवारी (ता. २३) विशेष न्यायालयासमोर सादर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची दोन दिवसाची पोलिस कोठडीत रवानगी केली.

वैशाली जामदार या २०२१ ते २३ यादरम्यान नागपूर विभागीय उपसंचालक कार्यालयात उपसंचालक म्हणून कार्यरत होत्या. मूळच्या अहिल्यानगर येथील असलेल्या जामदार यांच्या कार्यकाळात लक्ष्मण मंघाम उपसंचालक कार्यालयात कार्यरत होता.

त्याच्या सहकार्याने जामदार यांनी २११ बोगस शालार्थ आयडी तयार करीत आर्थिक व्यवहार केल्याची माहिती समोर आली आहे. तीन दिवसांपूर्वी पोलिसांनी लक्ष्मण मंघाम याला अटक केल्यावर दुसऱ्या दिवशी माजी उपसंचालक आणि सेवानिवृत्त अध्यक्ष अनिल पारधी यांनाही अटक केली. गुरुवारी या प्रकरणात चिंतामण वंजारी यांनाही अटक केली.

सायबर पोलिसांकडून शालार्थ आयडीचा तपास करून त्यातून कोणाच्या कार्यकाळात किती बनावट आयडी देण्यात आले, याचा शोध घेण्यात आला. सायबर पोलिसांनी केलेल्या तांत्रिक तपासात अनेकांनी आयडी तयार करून त्यातून शिक्षकांचे पेमेंट काढल्याची माहिती समोर आली. त्यात वैशाली जामदार यांनी आयडी तयार केल्याचे समोर येताच, त्यांनाही पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरातून शुक्रवारी (ता. २३) अटक केली असून दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. चौकशीतूनही अनेक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

शिक्षकदिनी स्वीकारला होता पदभार

वैशाली जामदार यांनी छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय शिक्षण मंडळात विभागीय सचिवपदाची २०२३ मध्ये सूत्रे स्वीकारली होती. विशेष म्हणजे शिक्षक दिनी (ता.५ सप्टेंबर) त्या रूजू झाल्या होत्या.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.