राज्यात सुपरहिट ठरलेली योजना म्हणजे लाडकी बहीण योजना. या योजनेतून महिलांना सरकारकडून आर्थिक आधार मिळतो. लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात प्रत्येकी १५०० रूपये जमा होतात. एप्रिल महिन्याचा हप्ता मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा झाला होता. पण मे महिन्याच्या हप्त्याबाबत अद्याप सरकारकडून कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. आता मे महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी माहिती समोर आलेली आहे.
योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी शासनाच्या वित्त विभागाने अनुसूचित जाती आणि जमाती विभागाचा निधी महिला आणि बालविकास विभागाकडे वळवला आहे. मे महिन्याच्या हप्त्यासाठी ३३५ कोटी ७० लाख रूपयांचा निधी आदिवाली विकास विभागाकडून महिला आणि बालविकास विभागाकडे वळवण्यात आला आहे. त्यामुळे मे महिन्याचा हप्ता लवकरच लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होतील, अशी माहिती समोर आलेली आहे.
लाडकी बहीण योजनेची सुरूवात कधी झाली?
काळात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली होती. पात्र महिलांना योजनेअंतर्गत दरमहा १५०० रूपये दिले जातात. विधानसभा निवडणुकीपूर्वी रक्कम १५०० वरून २१०० रूपये वाढवण्याचं आश्वासन सरकारमधील नेत्यांकडून देण्यात आलं होतं. मात्र, सत्तेत आल्यानंतरही ही वाढ अजून अंमलात आलेली नाही.
आर्थिक अडचणींचा सामना
सरकारकडून दरमहा पैसे देण्यासाठी विविध खात्यांमधून निधी वळवावा लागत आहे. या निधी वळवण्यावरून सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होता. 'जर सरकारला सामाजिक न्याय विभागाची गरज वाटत नसेल तर, हा विभागच बंद करा', अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. तसेच 'सरकार या खात्याकडे सतत दुर्लक्ष करत आहे', असा आरोपही त्यांनी केला.