भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानची पोलखोल झाली आहे. पाकिस्तानची जगभर नाचक्की झाली आहे. पाकिस्तानात पंतप्रधानापेक्षा लष्करप्रमुख महत्वाचे असल्याचे पहलगाम हल्ल्याप्रसंगी दिसून आले. आता पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी शाहबाज सरकारला घरचा आहेर दिला आहे. पाकिस्तानात कठपुतली सरकार आहे. त्या सरकारसोबत चर्चा करणे निष्फळ आहे. त्यामुळे चर्चा फक्त पाकिस्तानच्या लष्करासोबत करणार असल्याचे इम्रान यांनी म्हटले.
पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (पीटीआय) चे संस्थापक इम्रान खान ऑगस्ट 2023 पासून कारागृहात आहे. त्यांच्यावर अनेक खटले सुरु आहे. एप्रिल 2022 मध्ये त्यांचे सरकार पाडल्यानंतर त्यांना अनेक प्रकरणात अडकवण्यात आले. इम्रान खान यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले की, कठपुतली असलेल्या पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाज (पीएमएल-एन) सरकारसोबत चर्चा करणे निरर्थक आहे. या अवैध सरकारकडे काहीच अधिकार नाही. खोटे अधिकार मिरवणे, हाच एक कलमी कार्यक्रम या सरकारचा आहे.
इम्रान खान यांनी पुढे म्हटले की, चर्चा फक्त सत्तेत असणाऱ्या लोकांसोबतच (सैन्य अधिकारी) केली जाणार आहे. ही चर्चा फक्त राष्ट्रीय हिताच्या मुद्यांवर होणार आहे. माझा हेतू चांगला आहे. यामुळे मला अडचणींची भीती वाटत नाही. माझा आणि माझ्या पक्षातील इतर सदस्यांविरुद्ध निराधार राजकीय खटले दाखल केले जात आहे. जबरदस्तीने अपहरण करणे आणि जबरदस्तीने घेतलेल्या पत्रकार परिषदा हे पक्षातील सदस्यांना पक्षापासून दूर करण्याचा प्रयत्न आहे.
इम्रान यांनी पाकिस्तानात कायदाच शिल्लक नसल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, पाकिस्तानात पूर्णपणे जंगल राज आहे. 9 मे 2023 रोजी घडलेला प्रकार दडपशाही आहे. पीटीआयवर दबाब आणण्याचा हा प्रयत्न आहे. त्या दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज अजूनही सार्वजनिक करण्यात आले नाही. त्यामुळे सत्य बाहेर येत नाही, असा आरोप इम्रान यांनी केला. 9 मे 2023 रोजी इम्रान यांना पाकिस्तान लष्कराच्या अर्धसैनिक दलाने अटक केली होती.