पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात आज झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण तालुक्यात अक्षरशः जलप्रलयाची स्थिती निर्माण झाली आहे. भिगवण, स्वामी चिंचोली, आणि म्हसोबाचीवाडी या भागांत पावसाचा जोर अधिक जाणवला आहे. यामुळे रस्ते, घरे, मंदिरे पाण्याखाली गेल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. इंदापूर तालुक्यातील भिगवणमध्ये पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगतचा सर्व्हिस रोड तब्बल ३ किलोमीटर अंतरापर्यंत पाण्याखाली गेला आहे.
संपूर्ण बसस्थानक परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. काही घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांनी स्वतःच्या प्रयत्नांनी पाणी बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये एका घराची भिंत कोसळल्याचा प्रकार समोर आला असून सुदैवाने जीवितहानी झाली नाही. आज पहाटे 6 च्या सुमारास पुण्यातील ताडीवाला रोड येथील झोपडपट्टीत एका अरुंद गल्लीमध्ये 8 महिन्यांची गरोदर गाय अडकली. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
सेफ्टी बेल्ट, दोर, पुली यांसारख्या उपकरणांचा वापर करून गायीला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. मात्र गल्ली अत्यंत अरुंद (1.5 ते 2 फूट) असल्याने प्रयत्नांना अडथळा येत होता. यानंतर वाईल्डलाइफ रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने गल्लीतील चार जीने व कट्टे हटवून गायीला बाहेर काढण्यात यश आले. ही संपूर्ण मोहिम 10 तास चालली आणि अखेर गायीची सुटका झाली. गायीच्या सुरक्षिततेने आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
पुणे-सोलापूर महामार्गावर पाण्याची मोठी पातळी जमा झाल्यामुळे स्वामी चिंचोली येथे एक तासाहून अधिक काळ वाहतूक ठप्प झाली होती. अनेक वाहनचालक अडकले होते. प्रशासनाच्या मदतीने वाहतूक हळूहळू पूर्ववत करण्यात आली आहे. इंदापूर तालुक्यातील म्हसोबाचीवाडी गावात आजपर्यंत कधीही इतका पाऊस झालेला नव्हता. गावातील ओढ्याला नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. गावातील काही मंदिरे आणि घरे पूर्णतः पाण्याखाली गेली आहेत. नागरिकांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे.
NDRF टीम सतर्क, स्थानिक प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा. आपत्ती व्यवस्थापनासाठी विशेष पथक तैनात करण्यात आले आहे. पावसाचा जोर ओसरत नाही तोवर नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. प्रशासनाकडून मदत आणि पुनर्वसन कार्य सुरू आहे. हवामान विभागाने पुढील २४ तास मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.