कात्रज : जन्मताच एचआयव्हीसारखा गंभीर आजार, कुटुंबाने साथ सोडल्याने अनाथ उपेक्षितच जगणं पदरी आलं. मात्र, ममता फाउंडेशन संस्थेने आधार दिला. सांभाळ केला, शिक्षण दिले आणि स्वतः च्या पायावर उभे राहिलेले तरुण तरुणी सुखी आनंदी आयुष्याची स्वप्न साकारण्यासाठी लग्नाच्या बेडीत अडकले. ममता फाऊंडेशनने आधार दिल्यानंतर आता या मुलांना समाजानेही पूर्णपणे स्विकारले असल्याचे दिसून येत आहे. या सोहळ्याला अभिनेते, अभिनेत्री व समाजातील प्रतिष्ठात मंडळींनी उपस्थित राहत शुभाशीर्वाद दिले.
एचआयव्ही बाधित अनाथ उपेक्षितांचा सांभाळ करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी ममता फाउंडेशन संस्थेची स्थापना 200८ मध्ये डॉ. शिल्पा बुडूख व अमर बुडूख यांनी केली. सुरुवातीला भाड्याच्या जागेत सुरू असलेल्या संस्थेला माजी नगरसेवक प्रकाश कदम यांनी तीन गुंठे मोफत जागा दिली आणि संस्थेने स्वतःची इमारत उभारली. या संस्थेतील युवती चिरंजीवी रुपाली व भोर तालुक्यातील चिरंजीव महेश, ममता परिवाराचा चिरंजीव आकाश व लातूरमधील चिरंजीवी दिव्या यांचा शुभविवाह पारंपरिक पद्धतीने पार पडला. हळद, मेंहदी, बॉन्ड यांनी वातावरण प्रसन्न झाले होते.
माजी नगरसेवक प्रकाश कदम, अभिनेत्री तेजस्विनी पंडीत, अभिनेता जगन्नाथ निवंगुणे, माजी सरपंच दीपक गुजर यांनी वधूवरांना शुभाशीर्वाद दिले. यावेळी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर, संगीता यादव, शरद सोनवणे, आरोग्यनिरिक्षक प्रमोद ढसाळ आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सोहळ्याचे सूत्रसंचलन अॅड दिलीप जगताप यांनी केले.
ममता फाउंडेशन संस्थेत अंगा खांद्यावर खेळवळलेली माझी लेकरं आज विवाह बंधनात अडकली. कन्यादान व सोहळा आनंदाश्रूनी सोहळा पार पाडला. आज खऱ्या अर्थाने संस्था स्थापनेचे सार्थक झाले असे वाटते. उपेक्षित म्हणून बेवारस झालेल्या लेकरांची मी माय पूर्वीच झाले आज सून आणि जावईही आले.
-डॉ. शिल्पा बुडूख, संचालिका ममता फाउंडेशन