Pooja Khedkar : पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात माझा छळ, सेक्शुअल हॅरॅसमेंट...; पूजा खेडकरचे धक्कादायक आरोप
esakal May 26, 2025 03:45 AM

माजी ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिनं तिच्यावर झालेल्या आरोपांना उत्तरं दिली आहेत. तसंच मला आयएएस पद पुन्हा बहाल केलं जाईल असा विश्वासही व्यक्त केला आहे. न्याय उशिराने होईल पण मिळेल नक्की अशी खात्री असल्याचं पूजा खेडकरने म्हटलंय. मी मेहनतीने परीक्षा दिली, त्यासाठी अनेक गोष्टींचा त्यागही केला. कष्टाने मी युपीएससीत यश मिळवल्याचं पूजा खेडकरने सांगितलं. दरम्यान, ऑडी कारवर अंबर दिवा, केबिन बळकावल्याच्या आरोपात तथ्य नसल्याचा दावाही पूजा खेडकरने केला. तसंच जिल्हाधिकारी कार्यालयात सेक्शुअल हॅरॅसमेंट प्रकरणी राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिलं होतं असंही तिने सांगितलंय.

केबिन बळकावल्याच्या आरोपावर पूजा खेडकर म्हणाली की, मी तुमच्या ऑफिसवर कशी ताबा मिळवू शकते का? मी कुणाच्याही ऑफिसवर ताबा मिळवला नाही. नव्या कामाच्या ठिकाणी कुठे बसू असा प्रश्न प्रत्येकाला असतो. मी जर एखाद्या नव्या ठिकाणी गेले तर तिथं माझी बसण्याची व्यवस्था किंवा इतर सुविधा काय आहेत हे विचारणं गैर नाहीय. प्रशिक्षणाला सुरुवात झाल्यापासून माझा प्रत्येक दिवशी छळ झाला असा आरोपही पूजा खेडकरने केलाय.

जिल्हाधिकारी कार्यालयात सेक्शुअल हॅरॅसमेंट

जिल्हाधिकारी कार्यालयात आपला छळ झाल्याचं सांगताना पूजा खेडकरने धक्कादायक दावा केलाय. सेक्शुअल हॅरॅसमेंट झाली आणि याबाबत राज्याच्या मुख्य सचिवांना मी पत्र लिहिलं असल्याचं पूजा खेडकर म्हणाली. माझ्याकडे ते पत्र आहे आणि त्याचा मेलसुद्धा आहे. मात्र यावर पुढे कोणतीच कारवाई केली गेली नाही. हा मुद्दा मोठा असूनही पुढे आला नाही कारण मी त्यावर बोलणं टाळते.

आईने कव्हर असलेली बंदूक हवेत फिरवली

पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांचा बंदुक हवेत फिरवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्याबाबत विचारलं असता पूजा खेडकर यांनी सांगितलं की, माझ्या आईनं बंदूक फिरवली त्या बंदुकीला कव्हर होतं. ती लोड करणं आणि पॉइंट करणं हे खूप दूर राहिलं. केवळ नरेटिव्ह सेट करून नकारात्मक गोष्टी पुढे आणल्या गेल्या आणि आपल्याला अडकवण्यात आलं असा दावा पूजा खेडकरने केला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.