Scholarship Scam : बोगस शिष्यवृत्ती आयडी घोटाळा; प्रभारी उपसंचालकाच्या नागपूर आणि यवतमाळ येथील घरांवर छापा
esakal May 26, 2025 03:45 AM

नागपूर : बोगस शालार्थ आयडी घोटाळ्यात अटक करण्यात आलेल्या प्रभारी उपसंचालक चिंतामण वंजारी यांच्या नागपुरातील सुर्वेनगर आणि यवतमाळच्या घराची रविवारी (ता.२५) सकाळी झाडाझडती घेतली. या तपासणीत अनेक आक्षेपार्ह दस्तऐवज पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

शालार्थ आयडी प्रकरणाच्या घोळात सदर पोलिसांनी प्रथम विभागीय उपसंचालक उल्हास नरड यांना अटक केली. त्यानंतर उपसंचालक कार्यालयातील सूरज नाईक, भारत ढवळे, दुधाळकर आणि इतरांना अटक केली. त्यानंतर नरड यांना निलंबित करण्यात आल्यावर चिंतामण वंजारी यांना उपसंचालकांच्या पदाची सुत्रे देण्यात आली. वंजारी हे नागपूर जिल्हा परिषदेमध्ये प्राथमिक शिक्षणाधिकारी होते. त्यांच्याकडे काही दिवस माध्यमिक विभागाचाही प्रभार होता. दरम्यान दोन वर्षांपूर्वी त्याची विभागीय शिक्षण मंडळात सचिव म्हणून पदोन्नती झाली.

शालार्थ आयडी प्रकरणात प्राथमिक विभागातून अनेक बनावट प्रस्ताव तयार करून नियुक्त्या देण्यात आल्यात. या नियुक्त्यांतून २८१ बोगस शालार्थ आयडी तयार करीत, त्यांचे पगार सुरू करण्यात आले. या नियुक्त्यांमध्ये चिंतामण वंजारी यांचाही सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुरुवारी गुन्हा दाखल करीत, रात्री त्यांना घरातून अटक केली.

त्यांना शुक्रवारी न्यायालयात सादर केल्यावर न्यायालयाने २९ तारखेपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली. त्यानंतर रविवारी (ता.२५) त्यांच्या सुर्वेनगर आणि यवतमाळ येथील घराची तपासणी करण्यासाठी पथक रवाना करण्यात आले. दोन्ही घराच्या तपासात पोलिसांनी काही दस्तऐवज सापडले असल्याची माहिती आहे. पोलिसांकडून त्याची तपासणी सुरू आहे.

जामदारांच्या चौकशीत अनेकांची नावे उघड

पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथून अटक केलेल्या विभागीय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा आणि तत्कालिन उपसंचालक वैशाली जामदार यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. यादरम्यान चौकशी त्यांच्या कार्यकाळात कार्यालयातील काही विशिष्ट कर्मचाऱ्यांची नावे समोर आल्याची माहिती आहे. या कर्मचाऱ्यांनाही पोलिसांकडून अटक होण्याची शक्यता आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.