रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हवाई हल्ला; झेलेन्स्की यांची अमेरिकेच्या मौनावर मोठी प्रतिक्रिया
BBC Marathi May 26, 2025 03:45 AM
Reuters हल्ल्यामुळं लागलेली आग विझवताना बचाव पथकातील कर्मचारी.

रशियाने युक्रेनवरील हल्ल्यांची तीव्रता वाढवली आहे. एका रात्रीत मोठ्या प्रमाणावर ड्रोन आणि क्षेपणास्त्र डागत युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हवाई हल्ला करण्यात आला.

या हल्ल्यांमध्ये 3 लहान मुलांसह किमान 14 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. युक्रेनची राजधानी असलेल्या क्यीव्हमध्ये हा हल्ला करण्यात आला.

त्यामुळं रशिया शस्त्रसंधीच्या आवाहनांकडं दुर्लक्ष करत असल्याचं म्हटलं जात आहे.

रशियातील नेतृत्वावर मोठ्या प्रमाणात दबाव आणल्याशिवाय अशाप्रकारचं क्रौर्य थांबवता येणार नसल्याची प्रतिक्रिया या हल्ल्यानंतर युक्रेनचे अध्यक्ष वोलोदेमीर झेलेन्स्की यांनी दिली.

"अमेरिकेनं मौन कायम ठेवलं तर त्यातून रशियाला आणखी प्रोत्साहन मिळेल," असंही ते म्हणाले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध संपवण्याबाबत रशियातील नेतृत्व इच्छुक असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळं झेलेन्स्की यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करत अमेरिकेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

पुतीन यांनी फेब्रुवारी 2022 मध्ये युक्रेनवर आक्रमण करायला सुरुवात केली होती. तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी युक्रेनच्या जवळपास 20 टक्के भूभागावर ताबा मिळवला आहे.

यात युक्रेननं 2014 मध्ये ताब्यात घेतलेल्या क्रायमियाचाही समावेश आहे.

सर्वाधिक ड्रोन, क्षेपणास्त्रांचा वापर

या मोठ्या हल्ल्यानंतर बचाव पथकातील कर्मचारी जवळपास 30 हून अधिक शहरं आणि गावांमध्ये बचावकार्य करत असल्याचं झेलेन्स्की यांनी रविवारी (25 मे) एका निवेदनात म्हटलं आहे.

"रशिया हे युद्ध लांबवत असून रोज हत्या करत आहे. लोक आठवड्याच्या शेवटी सुट्ट्यांचा आनंद घेत असतात. पण युद्ध तर सुरूच आहे. मग कामांचे दिवस (वीकडेज) असो वा आठवड्याच्या शेवटचे (वीकेंड) सुट्टीचे दिवस असो. त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही," असंही त्यांनी म्हटलं.

ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या संख्येचा विचार करता शनिवारी (24 मे) रात्री करण्यात आलेल्या हल्ल्यात त्यांचा सर्वाधिक वापर झाला.

Reuters रशियाच्या हल्ल्यात उध्वस्त झालेली एक इमारत.

रशिया केवळ अधिक वेगाने हल्ला करत नसून त्याची तीव्रताही वाढवत आहे. शाहेद ड्रोनमध्ये आता आणखी आधुनिक तंत्रज्ञानासह अधिक स्फोटकांचा वापर केला जात आहे.

शनिवारी (24 मे) स्थानिक वेळेनुसार रात्री 8.40 पासून (17.40 GMT) रशियाने विविध प्रकारची 367 क्षेपणास्त्रं, मानवरहित हवाई वाहनांचा (UAV) आणि ड्रोनचा वापर करून हल्ले केले, असं युक्रेनच्या वायू दलानं सांगितलं.

रशियाची 45 क्रूझ क्षेपणास्त्र पाडली. तसंच 266 यूएव्ही नष्ट केल्याचं, युक्रेनच्या वायू दलानं सांगितलं. या हल्ल्यांचा युक्रेनमधील बहुतांश भागाला फटका बसला. तर 22 ठिकाणी शस्त्रांचा मारा झाल्याची नोंद झाल्याचंही सांगण्यात आलं.

त्यामुळं अनेक भागांमध्ये मृत्यूची नोंद झाली आहे.

क्यीव्ह दिनाच्या सुट्टीलाच हल्ला

रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी युक्रेनच्या वायू दलाची तळं, शस्त्रसाठे आणि इलेक्ट्रिक वॉरफेअर स्टेशनसह 142 ठिकाणांना लक्ष्य केल्याचं सांगितलं.

तर युक्रेनचे गृहमंत्री इहोर क्लायमेन्को यांनी म्हटलं, "13 भागांवर हल्ले झाले असून 70 हून अधिक लोक जखमी झाले. तसेच 80 निवासी इमारतींचे नुकसान झाले असून 27 ठिकाणी आग लागली."

नागरिकांना लक्ष्य करून करण्यात आलेला हा क्रूर हल्ला असल्याचं त्यांनी म्हटलं.

या हल्ल्यांनंतर शेकडो लोक आश्रयासाठी मेट्रो स्टेशनकडे धावले. सगळीकडं ड्रोनचे आवाज होते. त्यात हवाई संरक्षण यंत्रणेमुळं होणाऱ्या स्फोटांचे आवाज येत होते. त्यामुळं काही ठिकाणी आगीही लागल्या.

बीबीसीच्या एका सहकाऱ्यानं त्यांच्या घरापासून 5 मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या फ्लॅट्सचा एक ब्लॉक उध्वस्त झाल्याचं मेसेज करून सांगितलं.

राजधानीमध्ये वार्षिक क्यीव्ह दिनाची सुट्टी असताना हा हल्ला झाला.

दरम्यान, रशियामध्ये स्थानिक वेळेनुसार मध्यरात्री ते सात वाजेदरम्यान रशियातील 12 भागांवर युक्रेनचे सुमारे 110 ड्रोन आढळले. त्यांना नष्ट करण्यात आल्याचं संरक्षण मंत्रालयानं सांगितलं.

मॉस्कोचे महापौर सर्गेई सोब्यानिन यांनी राजधानीकडे जाणारे 12 ड्रोन पाडण्यात आल्याचं सांगितलं.

अनेक भागांत ड्रोनचे अवशेष कोसळले. त्यामुळं काही ठिकाणी इमारतींचं नुकसान झालं. मात्र, कोणीही जखमी झालं नसल्याचंही ते म्हणाले.

Kyiv Regional Military Administration रशियाच्या ड्रोन हल्ल्यांनतर क्यीव्हमध्ये अनेक घरांना आग लागली.

दोन्ही बाजूंच्या युद्धकैद्यांच्या देवाणघेवाणीचा रविवारी (25 मे) तिसरा आणि शेवटचा दिवस आहे. शुक्रवारी (23 मे) युक्रेन आणि रशियाने प्रत्येकी 390 सैनिक आणि नागरिक एकमेकांना सुपूर्द केले.

त्यानंतर शनिवारी (24 मे) 307 आणि रविवारी (25 मे) युक्रेन आणि रशियाने प्रत्येकी 303 सैनिक परतल्याचं सांगितलं. त्यामुळं 3 दिवसांमध्ये एकूण 1000 कैदी परतले आहे.

3 वर्षांच्या या संघर्षामध्ये तुर्कीमध्ये प्रथमच दोन्ही देशांमध्ये समोरासमोर चर्चा झाली होती. त्यानंतर ही कैद्यांची देवाण-घेवाण झाली.

आठवड्याच्या सुरुवातीला ट्रम्प आणि पुतीन यांच्या युद्धबंदी कराराबाबत फोनवरून 2 तास चर्चा झाली होती. ही चर्चा खूप चांगली झाली. तसंच रशिया आणि युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी लवकरच वाटाघाटी आणि चर्चा सुरू करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पुतीन यांनी मात्र 30 दिवसांच्या शस्त्रसंधीचा स्वीकार केलेला नाही. रशिया 'भविष्यातील संभाव्य शांततेसाठी' युक्रेनबरोबर 'सामंजस्य करार' करण्याच्या दिशेनं काम करेल, असं पुतीन म्हणाले आहेत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.