सनरायझर्स हैदराबाद संघाने इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेचा शेवट गोड केला आहे. रविवारी अखेरच्या सामन्यात हैदराबादने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वातील कोलकाता नाईट रायडर्सचा ११० धावांनी पराभव केला. हा सामना गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सचाही हा शेवटचा सामना होता.
या दोन्ही संघांचे आव्हान यापूर्वीच संपले होते. त्यामुळे हा दोन्ही संघांचा यंदाच्या हंगामातील अखेरचा सामना होता. कोलकातासाठी मात्र शेवट निराशाजनक राहिला. विशेष म्हणजे हे दोन्ही संघ गेल्यावर्षीचे अंतिम सामन्यात भिडलेले संघ होते, पण यंदा त्यांना प्लेऑफ गाठता आली नाही.
या सामन्यात हैदराबादने विक्रमी २७९ धावांचे लक्ष्य कोलकातासमोर ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाताचा संघ १८.४ षटकात १६८ धावांवर सर्वबाद झाला. हा हैदराबादचा आयपीएलमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा विजय आहे.
या विजयासह पाँइंट्स टेबलमध्ये ६ व्या क्रमांकावर उडी मारली आहे. त्यांचे आता १४ सामन्यांनंतर १३ गुण झाले आहेत. कोलकाता मात्र ८ व्या क्रमांकावर घसरले. त्यांचे १४ सामन्यांनंतर १२ गुणांवर राहिले.
क्विटन डी कॉक आणि सुनील नरेन सलामीला फलंदाजीला उतरले. डी कॉकची सुरुवात धीमी झाली, पण नरेनने आक्रमण केले होते. पण चौथ्या षटकात नरेनला जयदेव उनाडकटने त्रिफळाचीत केले. नरेनने १६ चेंडूत ३१ धावांची खेळी केली.
नंतर कर्णधार अजिंक्य रहाणेने आक्रमक खेळण्याचा प्रयत्न केला. पण त्याला ६ व्या षटकात उनाडकटनेच अभिषेक शर्माच्या हातून झेलबाद केले. रहाणेने ८ चेंडूत १५ धावा केल्या. पुढच्या षटकात ईशान मलिंगाने ९ धावांवर डी कॉकला बाद केले.
रिंकु सिंग आणि आंद्र रसेल यांना ८ व्या षटकात हर्ष दुबेने लागोपाठच्या चेंडूवर बाद करत धक्का दिला. रिंकु सिंग ९ धावांवर आणि रसेल पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाले. त्यामुळे ५ बाद ७० धावा अशी अवस्था कोलकाताची झाली होती.
त्यातच फॉर्ममध्ये असणाऱ्या अंगक्रिश रघुवंशीचा अडथळाही १४ धावांवर मलिंगाने दूर केला. रमणदीप सिंग १४ व्या षटकात हर्ष दुबेने त्रिफळचीत केले. पण नंतर मनिष पांडे आणि हर्षित राणा यांनी अर्धशतकी भागीदारी करत पराभवाचे अंतर कमी केले.
पण १८ व्या षटकात कोलकाताला सलग दोन चेंडूत दोन धक्के बसले. मनिष पांडेला ३७ धावांवर जयदेव उनाडकटने बाद केले. तसेच वैभव अरोरा शून्यावर धावबाद झाला. अखेर १९ व्या षटकात हर्षित राणा ३४ धावांवर बाद झाला. यासह कोलकाताचा डावही संपला.
हैदराबादकडून जयदेव उनाडकट, ईशान मलिंगा आणि हर्ष दुबे यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.
तत्पुर्वी, सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने २० षटकात ३ बाद २७८ धावा केल्या. हैदराबादकडून हेनरिक क्लासेनने ३९ चेंडूत नाबाद १०५ धावांची खेळी केली. त्याने ७ चौकार आणि ९ षटकार मारले.
ट्रॅव्हिस हेडने ४० चेंडूत ७६ धावांची खेळी केली. यात त्याने ६ चौकार आणि ६ षटकार मारले. अभिषेक शर्माने १६ चेंडूत ३२ धावा केल्या, तर इशान किशनने २० चेंडूत २९ धावा केल्या. अनिकेत वर्माने ६ चेंडूत १२ धावा केल्या.
कोलकाताकडून सुनील नरेनने २ विकेट्स घेतल्या. तसेच वैभव अरोराने १ विकेट घेतली.