भविष्यनिर्वाह निधीमध्ये सुलभ नियम
esakal May 26, 2025 08:45 AM

ॲड. प्रतिभा देवी - कायदेअभ्यासक

कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) २०२५ मध्ये आपल्या कोट्यवधी सदस्यांसाठी अनेक महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. कर्मचाऱ्यांना अधिक सुविधा देणे, प्रक्रिया डिजिटल करणे आणि पारदर्शकता वाढवणे हा यामागचा उद्देश आहे. या बदलांमुळे प्रोफाइल अपडेट करणे, नोकरी बदलल्यावर पीएफ ट्रान्सफर करणे किंवा पेन्शनशी संबंधित प्रक्रिया पूर्वीपेक्षा अधिक सुलभ झाली आहे.

प्रोफाइल अपडेट करणे सुलभ

आता कर्मचारी सदस्याला आपले प्रोफाइल ऑनलाइन अपडेट करणे सहजसुलभ झाले आहे. तुमचा ‘यूएएन’ म्हणजे युनिव्हर्सल अकाउंट नंबर आधारशी जोडलेला असेल, तर तुम्ही तुमचे नाव, जन्मतारीख, लिंग, राष्ट्रीयत्व, पालकांचे नाव, वैवाहिक स्थिती, जोडीदाराची माहिती आणि नोकरी सुरू आणि संपण्याची तारीख यात ऑनलाइन बदल करू शकता, तेही कोणत्याही कागदपत्राशिवाय. मात्र, ‘यूएएन’ एक ऑक्टोबर २०१७ पूर्वीचा असेल, तर काही तपशील अपडेट करण्यासाठी तुम्हाला तुमच्या नियोक्त्याची परवानगी घ्यावी लागू शकते.

नोकरी बदलताना ‘पीएफ’ ट्रान्स्फर सोपे

पूर्वी नोकरी बदलल्यानंतर प्रॉव्हिडंड फंड अर्थात भविष्यनिर्वाह निधी (पीएफ) ट्रान्स्फर करताना खूप अडचणी येत असत, आता ही प्रक्रियाही सोपी झाली आहे. जुन्या किंवा नवीन नियोक्त्याची मान्यता न घेता, ही प्रक्रिया पूर्ण करणे आता शक्य झाले आहे, मात्र त्यासाठी काही निकष आहेत.

  • एकाच ‘यूएएन’शी जोडलेल्या सर्व सदस्यांच्या आयडींचे हस्तांतर.

  • दोन वेगवेगळे ‘यूएएन’ आधारशी जोडलेले असतील आणि नाव, जन्मतारीख आणि लिंग यांसारखे तपशील सारखे असतील.

  • एक ‘यूएएन’ जुना असेल आणि दुसरा नवा असेल आणि आधार व इतर माहिती जुळत असेल.

संयुक्त डिक्लेरेशन सुटसुटीत

‘ईपीएफओ’ने संयुक्त डिक्लेरेशन प्रक्रियेसाठी नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. आता सदस्यांना तीन श्रेणींमध्ये विभागले गेले आहे :

अ) ज्यांचे ‘यूएएन’ आधारशी जोडलेले आहे, ते ऑनलाइन संयुक्त डिक्लेरेशन देऊ शकतात.

ब) ज्यांचा ‘यूएएन’ जुना आहे परंतु, आधारने सत्यापित केला आहे, तेही ऑनलाइन संयुक्त डिक्लेरेशन करू शकतात.

क) ज्यांच्याकडे ‘यूएएन’ नाही, आधार पडताळणी झालेली नाही किंवा सदस्याचा मृत्यू झाला आहे, त्यांच्यासाठी भौतिक संयुक्त डिक्लेरेशनची तरतूद उपलब्ध आहे.

पेन्शन पेमेंटसाठी नवी प्रणाली

‘ईपीएफओ’ने एक जानेवारी २०२५ पासून सेंट्रलाइज्ड पेन्शन पेमेंट सिस्टीम (सीपीपीएस) ही एक नवी प्रणाली सुरू केली आहे. याअंतर्गत, आता नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारे (एनपीसीआय) देशातील कोणत्याही बँक खात्यात थेट पेन्शन पाठवता येईल. यामुळे प्रादेशिक कार्यालयांमध्ये (पेन्शन पेमेंट ऑर्डर) म्हणजेच ‘पीपीओ’ हस्तांतराची गरज संपेल. नवे ‘पीपीओ’ जारी करताना डिजिटल जीवन प्रमाणपत्राची सुविधा उपलब्ध होण्यासाठी ‘यूएएन’ आधारित लिंक असणे आवश्यक असेल. दावा चुकून चुकीच्या कार्यालयात पाठवला गेला तर तो योग्य कार्यालयात परत पाठवला जाईल.

उच्च पेन्शनबाबत नवे धोरण

जे सदस्य जास्त पगाराच्या आधारावर पेन्शन घेत आहेत किंवा घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी ‘ईपीएफओ’ने नवे धोरण स्पष्ट केले आहे. सर्व पेन्शनधारकांसाठी पेन्शनची गणना एकाच पद्धतीने केली जाईल. ज्या संस्थांना सूट देण्यात आली आहे त्यांना ट्रस्टच्या नियमांचे पूर्णपणे पालन करावे लागेल. थकबाकी वसुली आणि थकबाकी भरण्याची प्रक्रिया स्वतंत्रपणे केली जाईल.

आणखी काही सुविधा

डिजिटल सुविधांमुळे ‘ईपीएफओ’ खात्यातील शिल्लक रकमेची माहिती टोल फ्री क्रमांक ९९६६०४४४२५ आणि ‘एसएमएस’द्वारे ७७३८२९९८९९ या दोन विशेष क्रमांकाच्या आधारे कळणार आहे. ही सेवा विनामूल्य आहे भारतातील अनेक प्रादेशिक भाषांमध्येदेखील ही माहिती मिळू शकते. कोणताही नियोक्ता किंवा अधिकृत स्वाक्षरीकर्ता ऑनलाइन ट्रान्स्फर क्लेम पोर्टलवर त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या निधी दाव्यांची माहिती देण्यासाठी डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट (डीएससी) सुविधा वापरू शकतो.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.