इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सने रविवारी (२५ मे) गुजरात टायटन्सविरुद्ध ८३ धावांनी मोठा विजय मिळवला. हा चेन्नई सुपर किंग्सला यंदाच्या हंगामातील अखेरचा सामना असल्याने त्यांच्यासाठी शेवट गोड राहिला.
मात्र असे असले तरी ते शेवटच्या क्रमांकावर कायम राहिले. यंदाचा हंगामत विसरण्यासारखा होता. त्यांना इतिहासात पहिल्यांदाच पाँइंट्स टेबलमध्ये शेवटच्या क्रमांकावर रहावे लागले आहे. चेन्नईला यंदाच्या हंगामात अनेक धक्के बसले, त्यात नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाडला स्पर्धेतूनही बाहेर व्हावे लागले.
खरंतर गेल्या काही वर्षापासून आयपीएलमधील निवृत्तीची चर्चा होत आहे. यंदाचा हंगामही त्याचा अखेरचा आहे का, असे प्रश्न उपस्थित होत होते. धोनीने गेल्यावर्षी ऋतुराजकडे चेन्नईचे कर्णधारपदही सोपवले होते. त्यामुळे ही चर्चा अधिक जोराने होत होती.
पण ऋतुराज आयपीएल २०२५ मधून ५ सामन्यांनंतर हाताला झालेल्या छोट्या फ्रॅक्चरमुळे बाहेर झाला. त्यामुळे पुन्हा एकदा धोनीने नेतृत्वपद स्वीकारले. ऋतुराज बाहेर गेला तेव्हा चेन्नईला ५ सामन्यांत ४ पराभव स्वीकारावे लागले होते. त्यामुळे चेन्नई ऋतुराजला कर्णधार म्हणून पुढच्यावर्षी कायम करणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले.
मात्र, गुजरातविरुद्धच्या सामन्यानंतर बोलताना धोनीने संकेत दिले आहेत की ऋतुराजच चेन्नईचा आयपीएल २०२६ मध्ये कर्णधार असणार आहे. त्याने संघाच्या कामगिरीबद्दल बोलताना पुढच्या वर्षी ऋतुराजला फार चिंता करण्याची गरज नसल्याचे म्हटले.
धोनी संघाच्या हंगामातील कामगिरीबद्दल बोलताना म्हणाला, 'जेव्हा हंगाम सुरु झाला होता, तेव्हा आमचे ६ पैकी चार सामने चेन्नईमध्ये होते. आम्ही त्यावेळी दवामुळे प्रथम गोलंदाजी घेतली. मात्र मला वाटते की पहिली फलंदाजी करण्यासाठी खेळपट्टी चांगली होती.'
तो पुढे म्हणाला, 'आम्ही दबावाखाली दुसऱ्या डावात फलंदाजी केली. त्यामुळे आमचा आत्मविश्वासही ढासळला. यामुळे आणखीच गोष्टी कठीण झाल्या. मला फलंदाजी फळीची काळजी वाटत होती कारण शेवटी धावफलकावर धावा असणे गरजेचे होते. प्रत्येकजण योगदान देत नव्हते. आम्ही धावा करू शकतो, पण अजूनही काही त्रुटी आहेत, ज्या आम्हाला भरून काढाव्या लागतील.
'पण सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की जेव्हा ऋतुराज पुढच्या हंगामात परत येईल, तेव्हा त्याला खूप चिंता करायची गरज नाही. पण त्याला फक्त प्लेइंग इलेव्हनमध्ये एक ठराविक भूमिका पार पाडायची असेल.'
याशिवाय धोनीने असेही म्हटले की त्याने अद्याप हा त्याचा अखेरचा हंगाम आहे की नाही, याबाबत निर्णय घेतलेला नाही.
तो म्हणाला, 'माझ्याकडे अद्याप निर्णय घ्यायला ४-५ महिने आहेत. काय करण्याची गरज आहे, हे ठवण्यासाठी घाई करण्याची गरज नाही. तंदुरुस्तीसाठी प्रत्येक वर्षी मेहनत घ्यावी लागते. या सर्वोच्च स्तरावर खेळताना तुम्हाला सर्वोत्तमच द्यावं लागतं. हे व्यावसायिक क्रिकेट असल्याने नेहमीच कामगिरीवर अवलंबून राहता येत नाही.'
'जर फक्त कामगिरीच्या आधारावर निवृत्ती घ्यायची झाली, तर काही जण २२ व्या वर्षीच निवृत्त व्हायला होतील. सर्वात महत्त्वाचं तुम्ही किती तंदुरुस्त आहात आणि किती योगदान देऊ शकता हे आहे. माझ्याकडे अजून वेळ असून मी रांचीला परत जाईल, बाईक राईड्स करेल आणि निर्णय घेईल. मी असंही म्हणत नाही की मी थांबतोय आणि असंही म्हणत नाही की मी परत येईलच. माझ्याकडे वेळ आहे, मी विचार करून निर्णय घेईल.'
चेन्नईला आयपीएल २०२५ मध्ये १४ पैकी फक्त ४ सामनेच जिंकता आले आहेत. तसेच त्यांना १० सामन्यात पराभूत व्हावं लागले आहे.