66598
कोल्हापूर ः महापालिकेच्या मॉन्सूनपूर्व कामांचा आढावा आमदार राजेश क्षीरसागर व जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी मंगळवारी घेतला. यावेळी महापालिका अधिकारी उपस्थित होते.
सुपारी घेऊन अतिक्रमणे काढू नका
आमदार राजेश क्षीरसागर; महापालिका अधिकाऱ्यांवर संताप, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधांबद्दल नाराजी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २७ ः ज्याचे अतिक्रमण आहे, त्यावर कायद्याप्रमाणे जरूर कारवाई करा. पण, कोणी तरी सांगितले म्हणून सुपारी घेऊन अतिक्रमण काढण्याची कारवाई करू नका? शहरात अनेक ठिकाणी अतिक्रमण आहे, तेथे का कारवाई होत नाही? असा सवाल आमदार राजेश क्षीरसागर यांनी केला. जिल्हाधिकारी कार्यालयात मॉन्सूनपूर्व कामांचा आढावा घेण्यासाठी आज त्यांनी बैठक घेतली. त्यांनी शहरातील पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, स्वच्छता, रिक्तपदे या मुद्यांवर महापालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
बैठकीत सुरुवातीला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी मॉन्सूनपूर्व कामांचा आढावा घेतला. त्यानंतर आमदार क्षीरसागर यांनी विविध विषयांची माहिती घेतली व अधिकाऱ्यांना प्रश्न सांगितले. अतिक्रमणाच्या मुद्द्यावर आमदार क्षीरसागर आक्रमक झाले. ते म्हणाले, काही ठिकाणी अतिक्रमण नसतानाही महापालिका अधिकारी, कर्मचारी कारवाई करतात. नागरिक त्यांना वस्तुस्थिती समजावून सांगतात पण ऐकले जात नाही. एका कारवाईत मी फोन केला; पण अधिकाऱ्यांनी फोन बंद केला. लोकप्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेणार नाही का?
शहरातील अनियमित पाणीपुरवठ्याबाबत क्षीरसागर यांनी खंत व्यक्त केली. ते म्हणाले, ‘थेट पाईपलाईनसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले. मग पाणीपुरवठा सुरळीत का नाही? स्काडा यंत्रणा सर्व शहरासाठी का वापरात नाही? निधीची आवश्यकता असेल, तर मला प्रस्ताव पाठवा. काही भागांत कमी पाणी येते, काही भागांत जास्त पाणी येते, असा दुजाभाव का?. पाणी, कचरा या विषयी लोकांच्यात तीव्र नाराजी आहे. महापुराच्या काळात पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करा.’
रस्त्याच्या पॅचवर्क बद्दल आमदार क्षीरसागर म्हणाले, ‘मी नसतानाही तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून रस्त्यासाठी १०० कोटींचा निधी आणला. पण, त्यावेळी निविदा काढली नाही. याला कोण जबाबदार? आता रस्ते करायला वेळ लागेल हे मान्य आहे. पण, जेथे शक्य आहे तेथे पॅचवर्क करा.’
बैठकीला अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जलअभियंता हर्षजित घाटगे, आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पावरा, उपशहर रचनाकार रमेश म्हस्कर, एन. एस. पाटील, उपशहर अभियंता महादेव फुलारी, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील आदी उपस्थित होते.
आठ दिवसांत
नालेसफाई पूर्ण करा
जिल्हाधिकारी म्हणाले, महापालिकेच्या दोन्ही उपायुक्तांनी परिसर वाटून घ्या. नाल्यांच्या उगमापासून शेवटपर्यंत पुढील आठ दिवसांत नाले सफाई झाली पाहिजे. आवश्यक यंत्रसामुग्री घ्या, पण काम पूर्ण झाले पाहिजे. जूनच्या पहिल्या पावसात नालेसफाई न झाल्याने घरात पाणी गेले. अशी एकही घटना होता कामा नये; अन्यथा अधिकाऱ्यांवर कारवाई करणार.
------------------------