सीबीएसई शाळेला यंदाही मुहूर्त नाही ?
भाईंदर, ता. २७ (बातमीदार) : मिरा-भाईंदर महापालिकेची सीबीएसई शाळा यंदाही सुरू होणार नाही, अशी चिन्हे दिसत आहेत. शाळा सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्ल्क राहिले आहेत; मात्र शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने महापालिकेची कोणतीही तयारी झालेली दिसून येत नाही.
खासगी शैक्षणिक संस्थांच्या सीबीएसई बोर्डाच्या शाळांकडून आकारण्यात येणारे लाखो रुपयांचे शुल्क सर्वसामान्य पालकांना परवडणारे नसते. यासाठी महापालिकेने स्वत:ची इंग्रजी माध्यमाची सीबीएसई शाळा सुरू करावी व त्यात गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण द्यावे, असा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वी आमदार प्रताप सरनाईक यांनी दिला होता. त्यानुसार भाईंदर पूर्व इंद्रलोक परिसरातील आरक्षण क्रमांक ११५ मधील शाळेत सीबीएसई शाळा सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. महापालिकेला स्वत:ला शाळा चालविणे शक्य होणार नसल्याने खासगी संस्थांच्या माध्यमातून ती चालविण्याचा महापालिकेचा विचार आहे. यासाठी खासगी संस्थांकडून प्रस्ताव मागविले आहेत. त्यानुसार महापालिकेकडे काही प्रस्ताव आले आहेत; मात्र त्यावर प्रशासनाकडून अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे यावर्षीही सीबीएसई शाळा सुरु होणे अवघड असल्याचे दिसत आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून सीबीएसई शाळा सुरु करताना पहिल्या टप्प्यात पूर्व प्राथमिक वर्ग सुरु करण्याचा महापालिकेचा प्रस्ताव आहे. प्रत्येक वर्गात वीस विद्यार्थी असतील व विद्यार्थ्यांची निवड आलेल्या अर्जातून लॉटरी पद्धतीने केली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते.
सरनाईक यांनी यावर्षी कोणत्याही स्थितीत सीबीएसई शाळा सुरु करावी, अशा स्पष्ट सूचना महापालिका प्रशासनाला दिल्या होत्या. ज्या संस्थांनी महापालिकेकडे प्रस्ताव दिला आहे. त्यांच्याकडूनही यावर्षी शाळा सुरु होण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. महापालिकेने शैक्षणिक संस्थांकडून प्रस्ताव तर मागवले मात्र शाळा सुरु करण्याबाबतचे स्वत:चे धोरणच अद्याप निश्चित केले नाही अशी माहिती प्रस्ताव सादर केलेल्या शैक्षणिक संस्थाचालकांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
नावीन्यपूर्ण उपक्रमांची पाहणी
महापालिकेच्या प्रमुख अधिकार्यांनी अलीकडेच पिंपर-चिंचवड महापालिकेचा दौरा केला. महापालिकेने सुरू केलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांची या वेळी पाहणी करण्यात आली. त्यात महापालिका चालवत असलेल्या सीबीएसई शाळेचाही समावेश होता. ही शाळा चालविण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेन निश्चित केलेल्या धोरणाचा अभ्यास करुन मिरा-भाईंदर महापालिकेला साजेसे धोरण तयार करण्याचे आदेश आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी संबंधित अधिकार्यांना दिले आहेत. त्याला लागणारा वेळ पहाता येत्या शैक्षणिक वर्षात महापालिकेची सीबीएसई शाळा सुरू होण्याची शक्यता कमी आहे.
सीबीएसई शाळा सुरू करण्यासाठी अत्यंत विचारपूर्वक धोरण आखण्यात येणार आहे. यावर्षी शाळा सुरू करण्यासाठी उशीर झाला असला तरी ती यावर्षीच सुरू करण्यासाठी प्रशासनाकडून पूर्ण प्रयत्न सुरु आहेत.
- राधाबिनोद शर्मा, आयुक्त, मिरा-भाईंदर महानगरपालिका