पालिकेची व्यायामशाळा सुरू करण्याची मागणी
गेल्या पाच वर्षांपासून बंद; ५७ लाख रुपये पाण्यात
तुर्भे, ता. २७ (बातमीदार) ः सानपाडा प्रभागात खासदार निधीमधून लाखो रुपये खर्च करून व्यायामशाळा बांधण्यात आली. तिचे उद्घाटनदेखील करण्यात आले. दरम्यान, गेल्या पाच वर्षांपासून ही व्यायामशाळा सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे ही व्यायामशाळा त्वरित सुरू करावी, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते नीलेश कचरे यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. आपली मागणी येत्या १५ दिवसांत पूर्ण न झाल्यास उपोषणाला बसण्याचा इशारा नीलेश कचरे यांनी दिला आहे.
सानपाडा विभागातील सेक्टर-५ येथे पालिकेच्या भूखंडावर सहा वर्षांपूर्वी खासदार निधीतून ५७ लाख रुपये खर्च करून शासकीय व्यायामशाळा उभारण्यात आली. त्याचे लोकार्पण तत्कालीन मंत्री, महापौर, आयुक्त, आमदार, खासदार, नगरसेवक यांच्या उपस्थितीत थाटामाटात करण्यात आले. त्यानंतर ही व्यायामशाळा सुरू करण्यात आली नाही. आजतागायत या व्यायामशाळा सुरू करण्याबाबत पालिका प्रशासनाकडून कोणतेही उत्तर देण्यात येत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. मागील काही वर्षांपासून सानपाड्यातील लोकसंख्या वाढली आहे. शिवाय येथील खासगी व्यायामशाळेचे दर सर्वाधिक आहेत. त्यामुळे सर्वसामान्य युवकांना पालिकेच्या व्यायामशाळेकडून आशा निर्माण झाल्या होत्या. मात्र गेल्या पाच वर्षांपासून ही व्यायामशाळा बंद असल्याने येथील नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे या व्यायामशाळेखाली उभारलेला सभामंडपाचा वापर करण्यात येत आहे. या सर्व बाबी कचरे यांनी आपल्या निवेदनात नमूद केल्या आहेत. सध्या या व्यायामशाळेत कोणतेही कार्यक्षम साहित्य नाही. शिवाय परिसरात सर्वत्र अस्वच्छता पसरली असल्याचेही कचरे यांनी निवेदनात म्हटले आहे.