Mysore Pak Name Change Due to Political Tensions: भारत-पाकिस्तानमधील संघर्ष आणि ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तान किंवा पाक असा शब्द असलेल्या अनेक गोष्टींवर अघोषित बंदी आली. पाकिस्तानची बाजू घेणाऱ्या तुर्किये येथील पदार्थांना विरोध झाला. जयपूरमधील एका मिठाईच्या दुकानाने दक्षिण भारतातील प्रसिद्ध मिठाई ‘म्हैसूरपाक’चे नाव बदलून ‘म्हैसूरश्री’ केले, तर ‘मोतीपाक’ या मिठाईचे नावही ‘मोतीश्री’ करण्यात आले. त्यानिमित्त ‘पाक’मिश्रित मिठाईचा हा धांडोळा...
देशात काय घडलेम्हैसूरपाक, मोतीपाक यांसह नावात पाक असा शब्द असलेल्या मिठाईला देशाच्या काही भागांत विरोध झाला.
भारत-पाकिस्तान संघर्षानंतर हैदराबाद येथील कराची बेकरीपुढेही मोठी निदर्शने झाली आणि दुकानासमोर पाकिस्तानविरोधी घोषणा देण्यात आल्या.
विविध शहरांमध्ये विक्रीसाठी असलेल्या मिठाईच्या नावात विरोध झाला. हा सारा प्रकार सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.
म्हैसूरपाकची जन्मकथाकर्नाटकातील (सध्याचे नाव मैसुरू) येथे २० व्या शतकाच्या सुरुवातीला या मिठाईचा जन्म झाला. १९०२ ते १९४० या काळात तत्कालीन म्हैसूर संस्थानावर राज्य करणारे कृष्णराज वडियार (चौथे) यांचा कार्यकाळ चर्चेत होता. बंगळूरमध्ये वीज आणण्यासह विविध विकासकामे त्यांच्या काळात करण्यात आली.
कृष्णराज वडियार हे खवय्येदेखील होते. ते वास्तव्यास असलेल्या अंबा विलास पॅलेसमध्ये काकासूर मदप्पा हे प्रमुख स्वयंपाकी होते. त्यांनी हरभाऱ्याच्या डाळीचे पीठ, तूप आणि साखर असे तीन पदार्थ एकत्र करून एक पदार्थ केला.
वडियार यांनी ही मिठाई चाखल्यानंतर फार आनंद झाला आणि त्यांनी त्याचे नाव विचारले. मदप्पा शांत उभे राहिले. काय उत्तर द्यावे, हे त्यांच्या लक्षात आले नाही. आपल्या राज्यातील शहराचे नाव प्रसिद्ध व्हावे म्हणून, राजा कृष्णराज यांनी त्या मिठाईला ‘म्हैसूर पाक’ असे नाव दिले. दक्षिण भारतासह उत्तर भारतातही ‘म्हैसूर पाक’ कालांतराने प्रसिद्ध झाला.
कन्नड भाषेमध्ये हरभरा डाळीच्या पीठासोबत साखरेचा पाक मिसळला असता, त्याला पाका असे म्हणतात. मात्र, जेव्हा हा शब्द इंग्रजी भाषेत उच्चारला अथवा लिहिला जातो, तेव्हा पाका या शब्दामधील ‘आ’ चा उच्चार केला जात नाही. तेव्हा, त्याला फक्त ‘पाक’ असे म्हटले जाते. सातत्याने अनेक वर्षे असाच उल्लेख केला गेला.
- एस. नटराज, मदप्पा यांचे पणतू (बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत)
परदेशातील वस्तूंना विरोधएखाद्या देशासोबत भारताचा संघर्ष वाढल्यानंतर संबंधित देशातील साहित्य, वस्तू, पदार्थ यांना सातत्याने विरोध केला जातो. अर्थात भारतात तयार झालेल्या मात्र त्याच्या नावात पाक असलेल्या मिठाईच्या झालेल्या नामांतराची घटना ‘दुर्मीळातील दुर्मीळ’ म्हणता येईल. २०२० मध्ये गलवानमध्ये चीनच्या सैनिकांसोबत भारतीय जवानांचा संघर्ष झाल्यानंतर चीनी साहित्यावरील बहिष्काराचा मुद्दा चर्चेत आला होता. त्यावेळीही सोशल मीडियावरून अशा स्वरूपाचे आवाहन करण्यात आले होते.