esakal May 28, 2025 02:45 AM

शेवगाव : स्वस्तात सोने देतो देण्याच्या आमिषाने शिवसेनेच्या नेत्या व त्यांच्या पतीने मुंबई येथील रिलायन्स कॉर्पोरेटच्या व्यवस्थापकाला चार लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी शेवगाव पोलिस ठाण्यात रिलायन्स कॉर्पोरेटचे व्यवस्थापक अतुल नामदेव अटकळे (वय ३७, रा. जुना ठाणे शहर) यांच्या फिर्यादीवरून विद्या जावेद गाडेकर व त्यांचे पती जावेद यासीन पठाण (रा. शेवगाव) यांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२३ डिसेंबर २०२० रोजी जावेद यासीन पठाण याने अटकळे यांना राहत्या घरी विद्यानगर, शेवगाव येथे बोलावून घेतले. त्यावेळी त्यांच्या पत्नी विद्या गाडेकर या देखील उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी घरात सोन्याचे दागिने दाखविले. त्यावेळी जावेद याने ‘आमचा सोने विक्रीचा व्यवसाय आहे. मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करतो. सोने खरेदी विक्रीचा व्यवसाय असल्याने इतरांना कमी दरात शुद्ध सोने विक्री करून त्याचा फायदा करून दिला आहे.

जास्तीत जास्त पैशाची गुंतवणूक केली, तर कमी दरात सोने देईल. आमच्यावर विश्वास ठेवा, आम्ही फसवणूक करणार नाही,’ असे आश्वासन दिले. दोघांनी घरातील सोन्याचे दागिने दाखविल्यानंतर त्यांच्यावर विश्वास ठेवून अटकळे आमिषाला बळी पडले. त्यानंतर १५ जानेवारी २०२१ रोजी २ लाख रुपये आणि २३ जानेवारी २०२१ रोजी आणखी २ लाख रुपये असे ४ लाख रुपये त्यांच्या खात्यावर वर्ग केले.

मात्र, त्यानंतर शुद्ध सोने दिले नाही. दरम्यानच्या काळात कोविड असल्याने अटकळे शेवगाव येथे येऊ शकले नाहीत. या दरम्यान त्यांनी वेळोवेळी फोन करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी फोन घेण्यास टाळाटाळ केली. त्यानंतरही सोने दिले नाही. गुंतवणूक केलेले पैसेही परत केले नाही. प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणे सांगून टाळाटाळ केली. त्या दोघांना पैसे मागितले असता तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करू, अशी धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक समाधान नागरे करीत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.