मोहोळ - आपल्या आईबरोबर प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून एका 32 वर्षीय युवकाचा खून करून त्याचा मृतदेह पुरून ठेवल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल झाला असुन ही घटना ता 24 ते 28 मे या दरम्यान सौंदणे ता मोहोळ येथे घडली.
नेताजी तानाजी नामदे (रा. सौंदणे, ता. मोहोळ) असे खून झालेल्याचे नाव आहे. तर विकास मारुती गुरव (रा. सौंदणे) असे संशयीताचे नाव आहे. विकास गुरव यास पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयासमोर उभे केले असता दोन जुनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित व मृत हे दोघे एकाच गावातील रहिवासी आहेत. विकास यास नेताजीचे आपल्या आईबरोबर प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. दरम्यान नेताजी हा गावातील गिरणीत दळण दळण्यासाठी ता. 24 मे रोजी गेला होता.
तो अद्याप घरी न आल्याने तानाजी नामदे यांनी गिरणीत जाऊन चौकशी केली असता, नेताजी हा दळण ठेवून अर्ध्या तासात येतो असे सांगून गेला आहे, तो अध्याप आला नसल्याचे गिरण मालक मोहन भानवसे यांनी सांगितले. दरम्यान नेताजीचे वडील तानाजी नामदे यांनी आपला मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार मोहोळ पोलिसात दिली होती.
दरम्यान नेताजी याचा गावात शोध घेत असताना सौंदणेतील आदित्य वाघमारे याने नेताजीला मोटरसायकलवर विकास गुरव यांच्या घरासमोर पहिल्याचे त्याने सांगितले. दरम्यान नेताजी घरी न आल्याने तानाजी नामदे यांना विकास गुरव यांनेच नेताजीचे बरे वाईट केल्याच्या संशय होता.
दरम्यान फिर्याद दाखल होताच पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप सावंत, पोलीस हेडकॉन्स्टेबल दयानंद हेंबाडे, अमोल जगताप, संदेश पवार या पथकाने संशयित विकास गुरव यास अटक केली व कसून चौकशी केली असता, त्याने नेताजीचा खून करून त्याचा मृतदेह शेतात पुरून ठेवल्याचे कबूल केले. संशयित विकास याच्या सांगण्यावरून पुरलेला मृतदेह बाहेर काढून, सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून त्याचे जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले.
या घटनेची फिर्याद तानाजी तुकाराम नामदे (वय-58, रा. सौंदणे) यांनी मोहोळ पोलिसात दिली असून, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन आतकरे हे करीत आहेत.