सातपूर- मुंढेगाव (ता. इगतपुरी) येथील जिंदाल पॉलिफिल्म प्रकल्पातील भीषण आग अजूनही पूर्णतः आटोक्यात आलेली नाही, तोच शासकीय यंत्रणांकडून कंपनीवर कारवाईचे ढग गडद होत चालले आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानंतर (एमपीसीबी) आता औद्योगिक सुरक्षा विभागानेही कारवाईचा बडगा उगारत कंपनीला तत्काळ ‘क्लोजर नोटीस’ बजावली आहे.
औद्योगिक सुरक्षा विभागाच्या सहसंचालक अंजली आडे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले, की जिंदाल कंपनीने औद्योगिक सुरक्षा कायद्याचा भंग केला आहे. १९४८ च्या कायद्यानुसार कलम ४० (२) अंतर्गत ही नोटीस बजावण्यात आली. योग्य ती सुरक्षा यंत्रणा आणि आधुनिक उपाययोजना अमलात न आणेपर्यंत कंपनीचे कामकाज थांबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
धग अजून कायमच!
या दुर्घटनेमुळे पूर्ण प्रकल्प भस्मसात झाल्याची शक्यता असून, आगीवर नियंत्रण मिळविले असले तरी अजूनही परिसरात धुराचे लोट उठत आहेत. त्यामुळे पुढील दोन-तीन दिवस धग कायम राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती सुरक्षा यंत्रणांकडून देण्यात आली.
दुर्लक्षाचा परिणाम...
विशेष म्हणजे, सन २०२३ मध्येही याच प्रकल्पात अशाच स्वरूपाची आग लागली होती. त्यानंतर कंपनी व्यवस्थापनाला ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश दिले गेले होते.यासाठी मुदतवाढ देऊनही व्यवस्थापनाने कोणतीही ठोस कृती केली नसल्याने सुरक्षा उपायांचा अभाव आणि व्यवस्थापकांचे ढिसाळ धोरण पुन्हा उघड झाले आहे. शासकीय यंत्रणांनी आता टप्प्याटप्प्याने कारवाई सुरू केली असून, या प्रकरणात आणखी कोणकोणत्या अधिकाऱ्यांवर कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आता वेळ कारवाईची...
दुर्दैव म्हणजे, वारंवारच्या इशाऱ्यानंतरही जबाबदार कंपन्या आणि व्यवस्थापन सुरक्षा उपायांकडे दुर्लक्ष करीत आहेत. यात नुकसान केवळ आर्थिक मर्यादेतच राहत नाही, तर कामगारांचे प्राण, परिसरातील पर्यावरण आणि संपूर्ण औद्योगिक क्षेत्राची विश्वासार्हता यावरही गदा येते. आता वेळ आली आहे ती केवळ नोटीसवर थांबण्याची नाही, तर कठोर आणि परिणामकारक कारवाई करण्याची!