कर्णधार जितेश शर्मा, मयंक अग्रवाल आणि विराट कोहली या त्रिकुटाने केलेल्या चाबूक खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएलच्या 18 व्या मोसमातील शेवटच्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सवर 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. आरसीबीने या विजयासह इतिहास घडवला आहे. आरसीबीने आयपीएल इतिहासात तिसऱ्या सर्वोच्च धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला. लखनौने आरसीबीसमोर 228 धावांचं आव्हान ठेवलं होतं. आरसीबीने हे आव्हान 18.4 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं. आरसीबीचा हा या मोसमातील एकूण नववा तर घराबाहेरील सातवा विजय ठरला. आरसीबीने या विजयासह टॉप 2 मध्ये धडक दिली आहे. तसेच आरसीबीची 2011, 2016 नंतर थेट क्वालिफायर 1 मध्ये पोहचण्याची तिसरी वेळ ठरली आहे. तर दुसऱ्या बाजूला लखनौला 227 रन्स करुनही पराभवाचा सामना करावा लागला आहे.
कर्णधार ऋषभ पंत याने केलेल्या 118 धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर लखनौने आरसीबीविरुद्ध 227 रन्स केल्या. प्रत्युत्तरात आरसीबीच्या फिलिप सॉल्ट आणि विराट कोहली या जोडीने अप्रतिम सुरुवात केली. या दोघांनी 61 धावा जोडल्या. फिलिप आऊट झाल्याने ही जोडी फुटली. फिलीपने 30 रन्स केल्या. त्यानंतर विलियम ओरुर्क याने आठव्या ओव्हरमधील शेवटच्या 2 चेंडूंवर आरसीबीला सलग 2 झटके दिले. रजत पाटीदार 14 धावांवर आऊट झाला. तर विलियमने लियाम लिविंगस्टोन याला पहिल्याच बॉलवर एलबीडब्ल्यू करत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. त्यामुळे आरसीबीची 3 आऊट 90 अशी स्थिती झाली.
त्यानंतर विराट आणि मंयक अग्रवाल या जोडीने काही वेळ आरसीबीचा डाव सावरला. मात्र फार वेळ हे शक्य ठरलं नाही. चौथ्या विकेटसाठी मयंक आणि विराटला 33 रन्सच जोडता आल्या. आवेश खान याने आरसीबीला मोठा झटका दिला. आवेशने विराटला आयुष बदोनी याच्या हाती कॅच आऊट केलं. विराटने 30 बॉलमध्ये 10 फोरसह 54 रन्स केल्या.
त्यानंतर मयंक आणि जितेश शर्मा या जोडीने आरसीबीला विजयी करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. दोघांनी ही जबाबदारी सार्थपणे पारही पाडली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 107 रन्सची नॉट आऊट पार्टनरशीप केली. या दरम्यान दिग्वेश राठी याने ही जोडी फोडण्यासाठी मंकडिंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्याला यश आलं नाही. तसेच लखनौला विकेटही मिळाली होती. मात्र नेमका तोच नो बॉल होता. त्यामुळे एकंदरीत आरसीबीला नशिबाचीही साथ मिळाली.
आरसीबीची ऐतिहासिक विजय
मयंक अग्रवाल याने 23 बॉलमध्ये 5 फोरसह नॉट आऊट 41 रन्स केल्या. तर जितेश शर्मा याने त्याच्या आयपीएल कारकीर्दीतील सर्वोच्च धावसंख्या केली. जितेशने 33 बॉलमध्ये 6 सिक्स आणि 8 फोरसह नॉट आऊट 85 रन्स केल्या. जितेशचं हे पहिलंवहिलं अर्धशतक ठरलं. लखनौकडून विलियम ओ रुर्क याने 2 विकेट्स मिळवल्या. तर आकाश महाराज सिंह आणि आवेश खान या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.