
आयपीएलचा महागडा खेळाडू आणि लखनऊचा कर्णधार ऋषभ पंतची बॅट संपूर्ण हंगामात शांत होती. मात्र शेवटच्या सामन्यात धुवाँधार फलंदाजी करत त्याने सर्व कसर भरून काढली. 61 चेंडूंमध्ये 11 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने 118 धावा चोपून काढल्या. त्यामुळे लखनऊने 3 विकेट गमावत 227 धावांचा डोंगर बंगळुरू समोर उभा केला होता. सामना जिंकून स्पर्धेचा शेवट गोड करण्याची लखनऊला संधी होती. परंतु बंगळुरूने लखनऊच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. सलामीला आलेल्या फिल सॉल्ट (30) आणि विराट कोहली (54) यांनी संघाला दणक्यात सुरुवात करून दिली. त्यानतंर झटपट विकेट पडल्या. परंतु जितेश शर्मा आणि मयांक अग्रवाल यांनी डाव सावरला आणि गोलंदाजांवर दोघेही तुटून पडले. मयांकने नाबाद 41 धावा केल्या तर जितेश शर्माने 33 चेंडूंमध्ये 8 चौकार आणि 6 षटकारांच्या जोरावर नाबाद 85 धावांची खेळी केली. दोघांच्या विस्फोटक फलंदाजीमुळे बंगळुरूने 8 चेंडू शिल्लक ठेवत आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला.