IPL 2025 : RCB च्या विजयानंतर टॉप 4 चं चित्र स्पष्ट, मुंबईसमोर एलिमिनेटरमध्ये कुणाचं आव्हान?
GH News May 28, 2025 04:04 AM

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने लखनौ सुपर जायंट्सवर आयपीएलच्या 18 व्या मोसमातील शेवटच्या साखळी सामन्यात धमाकेदार विजय मिळवला. आरसीबीने 228 धावांचं आव्हान हे 18.4 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून सहज पूर्ण केलं.आरसीबीचा हा या मोसमातील नववा विजय ठरला. आरसीबीच्या या विजयानंतर टॉप 4 चं चित्रही स्पष्ट झालं आहे. प्लेऑफसाठी गुजरात टायटन्स, पंजाब किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि मुंबई इंडियन्स या 4 संघांनी क्वालिफाय केलं होतं. मात्र टॉप 2 साठी जोरदार चुरस होती. मात्र आरसीबी विरूद्धच्या विजयानंतर टॉप 2 चं चित्र स्पष्ट झालंय.त्यामुळे कोणता संघ कुणाविरुद्ध कधी खेळणार? हे जाणून घेऊयात.

पंजाब किंग्सने सोमवारी 26 मे रोजी मुंबईचा धुव्वा उडवत टॉप 2 मध्ये धडक दिली होती. तर पराभवामुळे मुंबई एलिमिनेटर खेळणार हे निश्चित झालं होतं. मात्र लखनौ विरुद्ध आरसीबी या सामना निर्णायक होता. या सामन्यानंतर टॉप 2 मधील एक संघ निश्चित होणार होता. लखनौ जिंकली असती तर गुजरात टॉप 2 मध्ये कायम राहिली असती. मात्र आरसीबीने लखनौचा धुव्वा उडवला आणि टॉप 2 चं तिकीट मिळवलं. त्यामुळे गुजरातला टॉप 2 मधून बाहेर व्हावं लागलं. आता एका ट्रॉफीसाठी 4 संघांमध्ये थेट चुरस असणार आहे. मात्र टॉप 2 मधील संघांना अंतिम फेरीत पोहचण्याची 1 अतिरिक्त संधी मिळणार आहे. तर एलिमिनेटरमधील संघांना अंतिम फेरीसाठी 2 सामने जिंकावे लागणार आहेत.

साखळी फेरीतील कामगिरी

पंजाब, आरसीबी आणि गुजरात या तिन्ही संघांनी साखळी फेरीत 14 पैकी प्रत्येकी 9-9 सामने जिंकले. पंजाब आणि आरसीबीला 4-4 सामन्यात पराभूत व्हावं लागलं. तसेच पंजाब आणि आरसीबीचा प्रत्येकी 1-1 सामना हा पावसामुळे रद्द करण्यात आला. पंजाब आणि आरसीबीच्या खात्यात साखळी फेरीनंतर प्रत्येकी 19 पॉइंट्स आहेत. तर गुजरातनेही 9 वेळा विजय मिळवला. मात्र गुजरातने 5 सामने गमावले. तर मुंबईला 14 पैकी 8 सामन्यांमध्येच विजय मिळवता आला.

मुंबईसमोर गुजरातचं आव्हान, पंजाब आणि आरसीबीला फायनलसाठी 1 अतिरिक्त संधी

आयपीएल 2025 प्लेऑफचं वेळापत्रक

  1. क्वालिफायर 1, पंजाब विरुद्ध बंगळुरु, 29 मार्च
  2. एलिमिनेटर, गुजरात विरुद्ध मुंबई, 30 मार्च
  3. क्वालिफायर 2, क्वालिफायर 1 मधील पराभूत संघ विरुद्ध एलिमिनेटर विजेता संघ
  4. फायनल, क्वालिफायर 1 विजेता विरुद्ध क्वालिफायर 2 विजेता

स्टेडियम आणि वेळ

दरम्यान क्वालिफायर 1 आणि एलिमिनेटर सामन्यांचं आयोजन हे मुल्लानपूर, चंडीगढ येथे करण्यात आलं आहे. तर क्वालिफायर 2 आणि अंतिम सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोसदी स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. या चारही सामन्यांना संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.