कास : जिल्ह्यातील प्रसिद्ध वजराई धबधबा पाहून माघारी निघालेली पर्यटकांची बस आज दुपारी तीनच्या सुमारास तांबी गावच्या खालच्या बाजूला एका अवघड वळणावर साताऱ्याकडे येत असताना दहा ते पंधरा फूट खोल खड्ड्यात कोसळली.
यामध्ये चार ते पाच पर्यटक किरकोळ जखमी झाले असून, त्यांना साताऱ्यातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अवघड चढ चढत असताना अचानक बस मागे जाऊन दहा ते पंधरा फूट खोल खड्ड्यात कोसळली.
याबाबत मिळालेली माहिती अशी, कोल्हापूर जिल्ह्यातील काही पर्यटक दुपारी वजराई धबधबा पाहण्यासाठी आले होते. धबधबा पाहून परत माघारी साताऱ्याकडे येत तांबी गावच्या खालच्या बाजूला एका अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने बस मागे येऊन खड्ड्यात गेली. पोलिस प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी पर्यटकांना साताऱ्यात शासकीय रुग्णालयात दाखल केले.