Mumbai News : सावरकरांवरून 'मविआ'त तणाव! ...तर राहुल गांधींना काळे फासू; ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्याचा इशारा
esakal May 29, 2025 06:45 AM

मुंबई - स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी चुकीची वक्तव्ये केल्यास काँग्रेस नेते राहुल गांधी नाशिकमध्ये आल्यावर त्यांच्या तोंडाला काळे फासू, असा इशारा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिक उपमहानगर प्रमुख बाळा दराडे यांनी दिल्यानंतर महाविकास आघाडीतील या दोन पक्षांत या मुद्द्यावरून पुन्हा तणाव निर्माण झाला.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दराडे याच्यावर उलटवार केला. हुतात्मा कुटुंबाचा वारसा असलेले राहुल गांधी सोम्यागोम्यांच्या पोकळ धमक्यांना भीक घालत नाहीत. राहुल गांधी यांना धमक्या देणाऱ्यांना काँग्रेसचा कार्यकर्ताच चोख उत्तर देईल, असा सणसणीत इशारा सपकाळ यांनी दिला आहे.

दराडे म्हणाले, ‘राहुल गांधींनी सावरकर यांच्याबद्दल केलेले आक्षेपार्ह वक्तव्य खपवून घेणार नाही. मविआ गेली खड्ड्यात, आधी सावरकर आणि हिंदुत्व. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमीमध्ये आम्ही राहतो, त्याचा आम्हाला अभिमान आहे. राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत अपशब्द वापरले, त्याबाबत आम्ही त्यांचा निषेध व्यक्त करतो.

आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्या शैलीत राहुल गांधी यांना सुनावले आहे. सावरकरांबाबत अपशब्द वापरल्यास आम्ही त्यांना धडा शिकवू. जरी आम्ही महाविकास आघाडीमध्ये असलो तरी महाविकास आघाडी खड्ड्यात गेली,’ असा थेट इशारा दराडे यांनी दिला आहे.

दराडे यांनी केलेल्या या वक्तव्याचा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी देखील चांगलाच समाचार घेतला आहे. सपकाळ म्हणाले, ‘राहुल गांधी हे सावरकर यांच्याबद्दल काहीही चुकीचे बोललेले नाहीत, अपशब्द वापरलेले नाहीत, इतिहासातील दाखले देऊन त्यांनी त्यांची भूमिका मांडली आहे.

सावरकर यांच्याबद्दल जर समीक्षाच करायची असेल तर आतापर्यंत अनेक तज्ज्ञ, इतिहासकार, विचारवंत यांनी सावरकर यांच्याबद्दल काय म्हटले आहे, तेही पाहावे,’ असा सल्लाही सपकाळ यांनी दराडे यांना दिला.

भारतीय जनता पक्षाचे नेते अरुण शौरी हे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये मंत्री होते. त्यांनी सावरकर यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकात काय म्हटले आहे, तेही पाहावे व त्यावर बोलावे. एकट्या राहुल गांधींवर टीका करून त्यांना धमक्या देऊन काही साध्य होणार नाही, अशा धमक्यांना काँग्रेस पक्ष भीक घालत नाही, राहुल गांधी यांच्यामागे काँग्रेसचा कार्यकर्ता भक्कमपणे उभा आहे.

- हर्षवर्धन सपकाळ, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.