NEP 2020 : सर्व व्यापकता हेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे वैशिष्ट्य : डॉ. धोंडीराम पवार
esakal May 29, 2025 11:45 PM

प्रा.नागनाथ शिगाडे

तळेगाव ढमढेरे : लवचिकता आणि सर्व व्यापकता हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे मुख्य वैशिष्ट्य असून, तळागाळापर्यंत धोरण समर्थपणे पोहोचविणे ही शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी असल्याचे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. धोंडीराम पवार यांनी व्यक्त केले.

तळेगाव ढमढेरे ( ता.शिरूर) येथील साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयात मराठी व अर्थशास्त्र विभाग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गुणवत्ता सुधार योजनेअंतर्गत आयोजित द्वितीय वर्ष अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळेत डॉ. पवार प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

शिक्षण संस्थेचे संचालक महेश ढमढेरे अध्यक्षस्थानी होते. कार्यशाळेत पुणे, अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यातील एकूण १५० प्राध्यापकांनी सहभाग घेतला.

प्राचार्य अर्जुन मुसमाडे, मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य प्रा. सुधाकर शेलार, प्राचार्य शिवाजी ढगे, अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. सुनील उगले, प्रा. शिरीष लांडगे, प्रा.सोमनाथ पाटील, प्रा.संदीप सांगळे आदी उपस्थित होते.

डॉ. पवार पुढे म्हणाले की, "देशभरात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण प्रभावीपणे लागू झालेले आहे. प्राथमिक ते उच्च शिक्षण या टप्प्यांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे अनेक लाभ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. त्या अनुषंगाने शिक्षण व्यवस्थेतील सर्वच घटकांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे स्वागत करून अधिक प्रवाही आणि गतिशील पद्धतीने या धोरणाची अंमलबजावणी करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करावा असे आवाहन त्यांनी केले."

मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. सुधाकर शेलार म्हणाले की, भाषिक लवचिकता हे नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे मुख्य वैशिष्ट्ये आहे. त्यानुसार मातृभाषेला राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात दिलेले प्राधान्य अधिक प्रेरणादायी आहे. विद्यापीठ आणि महाविद्यालयातील अभ्यासक्रमांमध्ये अधिक सुसूत्रता येण्यासाठी व्यापक चर्चा आणि संवाद होणे आवश्यक असल्याचे डॉ. शेलार यांनी सांगितले.

अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे माजी अध्यक्ष प्राचार्य शिवाजी ढगे म्हणाले की, "अभ्यासक्रमांची निर्मिती करताना विद्यार्थी हा घटक केंद्रबिंदू मानून अभ्यास मंडळांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील बदल जाणून घेणे आवश्यक आहे. कौशल्याधिष्टीत आणि रोजगारक्षम अभ्यासक्रमाच्या निर्मितीसाठी अर्थशास्त्र अभ्यास मंडळ निश्चित प्रयत्न करेल असा विश्वास डॉ. ढगे यांनी व्यक्त केला."

शिक्षण संस्थेचे संचालक महेश ढमढेरे, प्राचार्य अर्जुन मुसमाडे,

प्रा. सोमनाथ पाटील, प्रा. संदीप सांगळे यांनी कार्यशाळेत मनोगत व्यक्त केले.प्रा. दत्तात्रेय वाबळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.रवींद्र भगत यांनी आभार मानले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.