पुणे - वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात पती शशांक, सासू लता आणि नणंद करिष्मा यांची गुरुवारी येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. वैष्णवी यांना सासरच्या मंडळींकडून झालेल्या त्रासाबाबत त्यांच्या मैत्रिणी आणि नातेवार्इक यांच्याकडे चौकशी करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयास दिली.
हुंड्यासाठी मानसिक, शारीरिक छळ करून वैष्णवी हगवणे हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटकेत असलेला पती शशांक राजेंद्र हगवणे (वय २७), सासू लता राजेंद्र हगवणे (वय ५४), नणंद करिष्मा राजेंद्र हगवणे (वय ३१) यांना न्यायालयाने बुधवारी (ता. २८) गुरुवारपर्यंत (ता. ३०) पोलिस कोठडी सुनावली होती. तर सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे (वय ६३), दिर सुशील राजेंद्र हगवणे (वय २७) यांना ३१ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
नीलेशचा राजेंद्र आणि सुशील यांच्या मदतीने शोध घेण्यात येत आहे. तर लता, करिष्मा व सुशिल हगवणे यांच्या मोबाईलचा देखील शोध सुरू आहे. चव्हाण व सुशिल हगवणे यांच्यामधील गुन्ह्याच्या अनुषंगाने झालेले चॅट, मेसेज हे पुराव्यासाठी जप्त करण्यात येत आहेत.
त्यामुळे शशांक, लता आणि करिष्मा हगवणे यांच्या पोलिस कोठडीचे हक्क अबाधित ठेवून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील नितीन अडागळे यांनी केला.
दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. पी. खंदारे यांनी आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल विभूते या गुन्ह्याचा तपास करत आहे. आत्तापर्यंत केलेल्या तपासाची माहिती त्यांनी न्यायालयास दिली.
नीलेश चव्हाणचा शोध सुरुच -
वैष्णवी यांच्या मुलाचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या कस्पटे कुटुंबीयांना पिस्तुलाचा धाक दाखवत धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला आरोपी नीलेश चव्हाण हा अद्याप फरार आहे. पोलिस त्याचा मागावर असून ते अद्याप मिळून आलेले नाही.