PBKS vs RCB Qualifier 1: बंगळुरूने पंजाबला धारेवर धरलं, आधी हेजलवूड अन् मग सुयश शर्माने शंभरीसाठीही तरसवलं
esakal May 30, 2025 08:45 AM

इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत गुरुवारी कोण अंतिम सामन्यात सर्वात आधी प्रवेश करणार याची उत्सुकता आहे. गुरुवारी पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे या स्पर्धेतील पहिल्या दोन क्रमांकावरील संघ क्वालिफायर १ सामन्या आमने-सामने आहेत. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पहिला डाव त्यांच्या गोलंदाजीने गाजवला आहे. त्यांनी पंजाब किंग्सला १०० धावांसाठीही मोठा संघर्ष करायला लावला. या सामन्यात पंजाब किंग्सने बंगळुरूसमोर १०२ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या सामन्यात बंगळुरूच्या क्षेत्ररक्षकांनीही अफलातून कामगिरी करताना अनेक धावा रोखल्या.

पंजाब किंग्सचे घरचे मैदान असलेल्या मुल्लनपूरमध्ये होत असलेल्या या सामन्यात विजय मिळवणारा संघ अंतिम सामन्यात पोहचणार आहे. दरम्यान दोन्ही संघ पहिल्या विजेतेपदाच्या प्रतिक्षेत असल्याने त्यांच्यासाठी हा सामना महत्त्वाचा आहे.

या सामन्यात बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे पंजाब किंग्स प्रथम फलंदाजीला उतरले. पंजाब किंग्सचा डाव १४.१ षटकात १०१ धावांवर संपुष्टात आला. त्यांच्याकडून फॉर्ममध्ये असलेले प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग या सलामीवीरांनी डावाची सुरूवात केली. पण दुसऱ्याच षटकात यश दयालने कृणाल पांड्याच्या हातून प्रियांश आर्यला ७ धावांवर माघारी धाडले. प्रभसिमरनने काही आक्रमक शॉट्स खेळले, पण त्यालाही तिसऱ्या षटकात भूवनेश्वर कुमारने १८ धावांवर जितेश शर्माच्या हातून झेलबाद केले. पाठोपाठ जोश हेजलवूडने दोन मोठे धक्के चौथ्या आणि सहाव्या षटकात पंजाबला दिले. त्याने चौथ्या षटकात कर्णधार श्रेयस अय्यरला २ धावांवर आणि सहाव्या षटकात जॉस इंग्लिसला ४ धावांवर बाद केले. नेहल वढेराही ८ धावा करून ७ व्या षटकात यश दयालविरुद्ध त्रिफळाचीत झाला. त्यामुळे ५० धावातच पंजाबला ५ धक्के बसले.

तरी मार्कस स्टॉयनिसने एक बाजू काही वेळ सांभाळलेली होती. पण सुयश शर्माने ९ व्या षटकात शशांक सिंह आणि इम्पॅक्ट प्लेअर मुशीर खान यांनी माघारी धाडले. शशांकला ३ धावांवर त्रिफळाचीत केले, तर मुशील शून्यावर पायचीत झाला. ११ व्या षटकात सुयशनेच धोकादायक ठरू शकणाऱ्या स्टॉयनिसला २६ धावांवर त्रिफळाचीत करत आठवा धक्का दिला. त्यानंतर अझमतुल्ला ओमरझाई आणि हरप्रीत ब्रार डाव सांभाळत होते. पण अखेर १४ व्या षटकात हरप्रीत ब्रारला रोमरियो शेफर्डने ४ धावांवर त्रिफळाचीत केले. १५ व्या षटकात ओमरझाईचा एका हाताने अफलातून झेल जितेश शर्माने घेतला. त्यामुळे पंजाब किंग्सचा डावही संपला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.