kan292.jpg
66904
सिंधुदुर्गनगरी ः येथील जिल्हाधिकारी कार्यालयात तहसील कार्यालयांसाठी वॉकीटॉकी प्रदान करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे उपस्थित होते.
आपत्ती कालावधीमध्ये तत्काळ संवाद साधण्यासाठी वॉकी टॉकी
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कणकवली तहसीलसाठी चार वॉकी टॉकी
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २९ः सिंधुदुर्गात निर्माण होणाऱ्या संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी तसेच आपत्ती कालावधीमध्ये जनतेला योग्य वेळी मदत पोहोचवण्यासाठी संवाद साधला जावा याकरता जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्यामार्फत तालुकास्तरावर वॉकी टॉकी प्रदान करण्यात आल्या.
यात कणकवली तालुक्यात चार वॉकी टॉकी दिल्या आहेत. पूरस्थिती किंवा आपत्तीच्या कालावधीमध्ये दूरध्वनी किंवा मोबाईल नेटवर्क द्वारे संपर्क तुटल्यास दोन किलोमीटरच्या अंतरापर्यंत या वॉकी टॉकी द्वारे संपर्क साधण्यासाठी उपयोग होणार असल्याची माहिती तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी दिली.
दरम्यान उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील शाखा प्रमुख यांना वायरलेस कम्युनिकेशन व वॉकी टॉकी हाताळण्याचे प्रशिक्षणही देण्यात आल्याचे श्री. देशपांडे म्हणाले. या प्रशिक्षणात वॉकी टॉकी हाताळण्याचे प्रात्यक्षिकांसह पूर, चक्रीवादळ अशा आपत्ती काळात संवाद साधण्यासाठी वॉकी टॉकी किंवा वायरलेस कम्युनिकेशन हे कसे उपयुक्त ठरते याचे प्रशिक्षण देण्यात आले. कणकवली तालुक्यात खारेपाटण येथे पूरस्थिती ओढवल्यानंतर तेथील जैनवाडीचा इतर भागाशी संपर्क तुटतो. तसेच खारेपाटण बाजारपेठेत आणि घरांमध्येही पाणी जाऊन खारेपाटण शहरात जाण्या येण्याचा मार्ग बंद होतो. अशा आपतकालीन परिस्थितीत तेथील महसूल कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी या वॉकीटॉकी उपयुक्त ठरणार असल्याचे श्री. देशपांडे म्हणाले.