नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरनंतर परदेशात भारताची बाजू मांडण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करणारे काँग्रेस नेते शशी थरूर यांना पुन्हा एकदा काँग्रेस पक्षातून लक्ष्य करण्यात आले आहे. थरूर यांनी सरकारची प्रशंसा केल्यावरून काँग्रेसचे नेते उदित राज यांनी थरूर यांना परराष्ट्र मंत्री बनवा असा खोचक सल्ला सत्ताधाऱ्यांना दिला होता. त्याच मालिकेत आज काँग्रेसच्या माध्यम विभागाचे अध्यक्ष पवन खेडा यांनी, पूर्वीच्या सर्जिकल स्ट्राईकवर शशी थरूर यांनी केलेल्या टीकेचा संदर्भ देत थरूर यांना लक्ष्य केले.
२०१८ मध्ये शशी थरूर यांनी लिहिलेल्या ''द पॅराडॉक्सिकल प्राइम मिनिस्टर'' या पुस्तकातील उतारा पवन खेडा यांनी उधृत केला. त्यात थरूर यांनी २०१६ च्या सर्जिकल स्ट्राईकचा बेशरमपणे फायदा घेण्याचा भाजपकडून प्रयत्न होत असल्याची टीका केली होती. हा उतारा जोडून पवन खेडा यांनी ट्विट केले की डॉ. शशी थरूर यांच्या मताशी मी सहमत आहे. पनामामध्ये पाकिस्तानविरोधातील सैन्यदलाच्या कारवाईची प्रशंसा करताना शशी थरूर यांनी केलेल्या ताज्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर पवन खेडा यांची ही टिपणी समोर आहे.
दुसरीकडे, शशी थरूर यांनीही काँग्रेसमधून व्यक्त होणाऱ्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावरून आपली भूमिका मांडली आहे. आपण म्हटलेल्या गोष्टींकडे टीकाकार आणि ट्रोल्स त्यांना हव्या त्या दृष्टीने बघू शकतात. ते वस्तुस्थितीचा विपर्यास करून मांडू शकतात आणि माझ्यावर टीका करण्यासाठी ते मोकळे आहेत. तर माझ्याकडे करण्यासाठी अधिक चांगल्या गोष्टी आहेत, असे उपरोधिक ट्विट थरूर यांनी केले आहे. यामुळे थरूर विरुद्ध काँग्रेसमधील अन्य नेते असा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.