कॉंग्रेसच्या नेत्याचे सेक्रेटरी पाकिस्तानी हेरगिरी करतात
Marathi May 30, 2025 05:26 PM

6-7 वेळा केला होता पाकिस्तानचा प्रवास

वृत्तसंस्था/जैसलमेर

राजस्थानच्या जैसलमेर येथून पोलिसांनी एक सरकारी कर्मचारी आणि काँग्रेस नेत्याच्या माजी सचिवाला अटक केली आहे. काँग्रेस नेत्याच्या या माजी सचिवाने पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयसाठी हेरगिरी केल्याचा आरोप आहे. संबंधित इसम 6-7 वेळा पाकिस्तानात जाऊन आल्याचे समोर आले आहे. राजस्थान सीआयडी आणि विशेष पथकांनी जैसलमेरच्या एका शासकीय विभागात कार्यरत शकूर खानला ताब्यात घेतले. शकूर खान जैसलमेरचा रहिवासी असून तो रोजगार कार्यालयात कार्यरत आहे. ऑपरेशन सिंदूरदरम्यान तो जिल्हा प्रशासनाच्या नियंत्रण कक्षात तैनात होता.

शकूर खान संशयास्पद हालचालींमध्ये सामील असल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. गुप्तचर यंत्रणा काही काळापासून त्याच्यावर नजर ठेवून होत्या, शकूर खानचे पाकिस्तानी दूतावासाच्या अधिकाऱ्यासोबत कनेक्शन असल्याचे आढळून आले होते. तसेच त्याने आयएसआयसाठी हेरगिरी केल्याचे कळले होते. संशयास्पद कारवायांमध्ये त्याच्या सहभागाविषयी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून माहिती मिळाली होती. याच आधारावर आम्ही त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे जैसलमेरचे पोलीस अधीक्षक सुधीर चौधरी यांनी सांगितले आहे.

काँग्रेस सरकारच्या काळात मंत्र्याचा सचिव

शकूर खान हा पूर्वी काँग्रेस सरकारमध्ये मंत्री राहिलेले सालेह मोहम्मद यांचा वैयक्तिक सचिव राहिला आहे. दोघेही एकाच गावाचे रहिवासी आहेत. गुप्तचर पथकाला खानच्या मोबाइलमध्ये अनेक पाकिस्तानी क्रमांक मिळाले असून याबद्दल खानला कुठलेच समाधानकारक स्पष्टीकरण देता आलेले नाही. 6-7 वेळा पाकिस्तानला जाऊन आल्याचे चौकशीदरम्यान खानने मान्य केले.

मोबाइल, बँक खात्यांची तपासणी सुरू

खानच्या मोबाइलमध्ये अद्याप संवेदनशील सामग्री मिळालेली नाही, परंतु त्याच्या उपकरणातून अनेक पोस्ट डिलिट करण्यात आले आहेत. गुप्तचर यंत्रणांकडून त्याच्या दोन बँक खात्यांसह वित्तीय नोंदीची तपासणी केली जात आहे. काही काळापासून त्याच्या हालचालींवर नजर ठेवली जात होती.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.