पुणे : हगवणे कुटुंबास शस्त्रपरवाना देण्याच्या प्रकरणात विशेष पोलिस महानिरीक्षक (तुरुंग प्रशासन व कारागृह) डॉ.जालिंदर सुपेकर यांच्यावर आरोप होऊ लागले आहेत. दरम्यान, डॉ.सुपेकर यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावत संबंधितांना शस्त्रपरवाना मी नव्हे तर, तत्कालीन पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखालील समितीने दिलेला असल्याचे स्पष्ट केले आहे.
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेल्या पती शशांक व दीर सुशील हगवणे यांच्याविरुद्ध खोटी कागदपत्रे सादर करून शस्त्रपरवाना मिळविल्याप्रकरणी गुरुवारी रात्री वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर पुणे पोलिस आयुक्तालयात तत्कालीन अतिरीक्त पोलिस आयुक्त असलेल्या डॉ.सुपेकर यांच्यावर हगवणे कुटुंबीयांना झटपट शस्त्रपरवाना मिळवून दिल्याचा आरोप होऊ लागला आहे.
याविषयी डॉ. सुपेकर म्हणाले, "संबंधित कुटुंबीय माझे दूरचे नातेवाईक आहेत. मी त्यांना शस्त्रपरवाना देण्याचा संबंध नाही. शस्त्रपरवान्याचा प्रस्ताव पोलिस ठाण्यामार्फत पडताळणी करून येतो. त्यानंतर पोलिस आयुक्त व अन्य वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या समितीच्या मान्यतेनंतरच परवाना मिळतो. पोलिस ठाण्याकडून संबंधितांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासूनच प्रस्ताव सादर करावे लागतात.